ही विनोदी गोष्ट मी कुठेतरी वाचलेली आहे. जशी आठवली तशी लिहित आहे. चु. भू. दे. घे.
काही वर्षांपुर्वीचा काळ. अनामवाडीतील जि. प. ची शाळा. कुठलाही शिक्षक दोन महिन्यांच्या पुढे न टिकण्याची शाळेची परंपरा. अशातच जानेवरीच्या आगेमागे नुकतेच रुजू झालेले, मारकुटे मास्तर - टिपिकल पुणेरी पेहेरावातले आणि संस्कारतले, ग्रामीण भागातील मुलांना अभ्यासाबरोबरच शिस्तीचंही महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांची खास नेमणूक करण्यात अलेली होती. त्यामुळे एका हातात खदू आणि दुसऱ्या हातात छडी असं चित्र दिसायचं. पुढे पोरांच्या अनुभवावरून मास्तरांच्या हातात खडूऐवजी नुसत्या छडीचंच चित्र दिसू लगलं. ते कडक शिस्तीच्या नावाखाली निमित्तच शोधायचे. पोरंही जाम वैतगली होती.
जूनचा महिना, सोमवारचा दिवस, तिसरीचा वर्ग. कडक चेहऱ्याने प्रार्थना संपवून मारकुटे मास्तर छडीसह वर्गात आले. आणि जरासा उशीरा येणाऱ्या बाळ्याकडे बघून त्यांना निमित्तच सापडले. हातातली छडी तलवारीसरखी नाचवत मराकुटे मास्तर चिरकले -
"काय रे बाळ्या, शाळेत यायला उशीर का झाला, बोल ? "
"आवं गुर्जी माजं ऐकून तर घ्या."
"काय ऐकून घ्यायचं रे तुझं सतरा वेळा ? आणि हातात हे मडकं कशाला आणलंस ?"
" तेच सांगयचय तुमस्नी. पन आदी ह्यो तुमच्यासठी केलेला पेशल आमरस प्या बरं. मंग तुमस्नी बैजवार सांगतो मस्नी उशीर का झाला ते ?" बाळ्या आमरसनं गच्चं भरलेलं मडकं मास्तारांपुढे करत समजावणीच्या सुरात म्हणाला.
आमरसचं मडकं बघून मास्तरांच्या तोंडाला पाणी सुटलं. "बरं बरं, आण इकडं" असं खोट्याच रागानं म्हणत, बाळ्याच्या हातातलं मडकं जवळजवळ हिसकावूनच घेत मास्तरांनी एकदम आमरसाची धारच तोंडावर धरली आणि गटागटा आमरसं पिऊन टाकला. डावा हात पोटावरून फिरवत आणि यथेच्छ ढेकर देत, उजव्या हातातली छडी पुन्हा बाळ्यपुढे तलवारीसारखी नाचवत मारकुटे मास्तर चिरकले, " आता बोल, तुला का उशीर झाला ते ? "
बाळ्यानं आवंढा गिळल आणि रामायण सांगायाला सुरुवात केली - "आवं गुर्जी काय सांगायाचं तुमास्नी, तुमच्याकरता पंधरा दिसापुर्वी बगा, अमच्या खाल्लीकडल्या वावरतल्या आंब्याच्या झाडाचं, चुकारीचं धा-बारा आंबं, त्याच झाडाच्या बुंध्याला पिकत ठेवलं व्हतं. शनवारची अर्धी साळा सुटल्यावर जो पळालो तो सरळ आंब्याकडंच. पाला बाजुला सारुन बगितलं तर आंबा पिकलेला व्हता. समदं आंबं घिऊन घरी आलो. आज सक्कळी साळंत यायच्या टायमाला बगा मडक्यात आम्रस केला आन् कुयट्यानं सली टाकायला म्हनून उकीर्ड्याकडं गेलो. तवर हिकडं लूत भरलेल्या मरतुकद्या कुत्र्याचं ध्यान कसं गेलं कुनाला ठावं? म्या उकीर्ड्यावरनं येऊन बघतोय तर हे कुत्रं मडक्यात त्वांड खुपसून चटाचटा आम्रस चाटत व्हतं. माला लई राग आला. म्हणलं, च्यामारी आमच्या आवडत्या गुर्जीसाठी केलेला आम्रस या लूत भरलेल्या मरतुकड्या कुत्र्यानं प्यावा? मंग म्या पुढचा इचारच केला नाय. बाजूलाच पडलेला धोंडा पटशिरी उचलला आन् कुत्र्याच्या मगं पळतच सुटलो. परं कुत्रं तरी कसलं तावडीत घावतंय वो? कुत्रं म्होरं म्या मागं, कुत्रं म्होरं म्या मागं... शेवटी पळून पळून म्या दमलो. 'पुन्यांदा घाव, मग दावतो तुला इंगा' असं म्हणतं साळंला उशीर व्हईल म्हणून पळतच घरला आलो न् बिन जेवताच, मडकं उचललं ते थेट तुमच्याकडंच आलो. म्हणून बगा मला साळत यायला उशीर लागला."
हे ऐकल्यावर शाळेतली पोरं लागली हसायला. पण मारकुटे मास्तरांच्या पोटात मात्र मळमळायला लागलं. 'ते' आमरसचं मडकं आठवून त्यांना पार रसातळाला गेल्यासारखं वाटलं. कुठल्याही क्षणी आता भडाभडा उलटी होणार असं वाटू लागलं. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. डोळे रागानं तांबडेलाल झाले. हातातल्या छडीनं तलवारीऐवजी दांडपट्ट्याचं रुप धारण केलं. कपाळावरची शीर आणखीनच तट्ट फुगवत मास्तर आणखीनच चिरक्या आवाजात चिरकले -
"हरामखोरा, आधीच शाळेला उशीरा आलास ते आलास आणि वर मला लूत भरलेल्या कुत्र्याचा आमरस पाजलास? थांब आता तुला तं-" असं म्हणून मास्तर बाळ्याला पकडण्यासाठी धावले. पण तो कसला सापडतोय? मावळं खोऱ्यातलं वारं पिलेला बाळ्या, डाव्या हातानं चड्डी आणि उजव्या हातानं टोपी सावरत धूमचटाक् पळाला. मास्तरांना बाळ्याला खाऊ की गिळू असं झालं होतं. तेवढ्यात त्यांना 'ते' मडकं दिसलं. त्यांनी बाळ्यावरचा राग मडक्यावर काढला. आणि बाळ्या समजून मास्तरांनी ते मडकंच दात ओठ खाऊन, वर उचलून जोरात खाली आपटलं. आपटलं तसं मडकं फुटलं. मडकं फुटलं तसं बाळ्यानं भोकाड पसरलं. 'आमचं फुटलेलं मडकं भरून द्या.. असं हात झाडत अणी पाय आपटत बोंबलू लागला. मास्तर आता आणखीनच चिरकून म्हणाले-
शिंच्या, आधी माला लूत भरलेल्या मरतुकड्या कुत्र्याचा आमरस पाजलास आणि फक्त दीड-दमडीचं मडकं फुटल्याचं निमित्त झालं तर, वर तोंड करुन भोकाड पसरून, दोन्ही हातांनी बोंबलायला काय झालं रे हरामखोरा?"
तसा बाळ्या आणखीनच भोकाड पसरून म्हणाला-
'आता आमचा आजोबा कशात थुकणार?'
'!!....???'