धर-सोड

धरसोड बरी नाही म्हणतात,
आयुष्यभर तरीही सगळे
धरसोडच तर करत असतात !
हवंहवंसं ते धरु पहातात,
नकोसं झालेलं सोडत रहातात...

भेटत असतात रोज असंख्य
माणसं,विचार, अनुभव, प्रसंग
सोडू काय ,धरु  कुणाचा संग
धरसोडीचा  नित्य नवा रंग !

काय, कसं, किती वेळ धरावं
घट्ट पकडावं का अधर धरावं ?
कधी नाद सोडून मागे फिरावं,
कशाच्या आशेने पुढे सरावं...

धरु पाहिलेलं निसटत रहातं,
सोडलेलं वारंवार भेटत रहातं
ह्या धरसोडीला धरुनच वहातं
जीवनातलं पाणी आटत रहातं.

आपण काहीतरी सोडूनच इथे येतो
उरात भरलेला पहिला श्वास धरुन
त्याचीच धर-सोड करत रहातो,
ठरल्या वेळेपर्यंत-- धीर धरुन.

आधी सोडू म्हटलं, सोडवत नाही
वेळेला धरु म्हटलं, धरवत नाही !

ह्या धरसोडीला आयुष्य पुरत नाही,
नंतर मात्र, सोडून द्यायला
धरसोड सुद्धा उरत नाही.....