राधाताई आणि मेघनामावशी फिरून आल्या तेव्हा सकाळचे सात वाजून गेले होते. विश्वासराव शांतपणे पेपर वाचत हॉलमध्ये बसले होते. बाकी घरात कुठे काही हालचाल, गडबड जाणवत नव्हती.
"अहो, सात वाजून गेले. ही दोघं उठली नाहीत अजून." राधाताई उद्गारल्या.
"हम्म....".
"अहो उठवा त्यांना आता".
"झोपू दे गं त्यांना. नव्या नवलाईचं लग्न आहे दोघांचं. रात्र मोठी आणि दिवस छोटा आहे त्यांचा सध्या".
"अहो, पण त्या छोट्याश्या दिवसात स्नेहलला एका इंटरव्ह्यूला जायचं आहे. एवढी मोठी झालीये तरी स्वतःच्या जबाबदार्या कळत नाहीत अजून. उठल्यावर म्हणेल, अय्या काकू, गजरच नाही झाला." राधाताई तोंड वेंगाडत बोलल्या तशी विश्वासरावाना फसकन हसायला आलं.
"म्हणजे काय राधाताई, स्नेहल तुला 'अहो आई' नाही म्हणत बाकीच्या सूनांसारखी?" मेघनामावशीने नवलाने विचारलं.
"ती ह्यांना पण काकाच म्हणते". राधाताई तडतडल्या.
"अगं तुझ्या मैत्रीणीची मुलगी मला 'बाबा' म्हणाली तर भलतेच गैरसमज होतील ना...." विश्वासराव हसत हसत म्हणाले.
"तुम्ही भलत्या वेळी भलते विनोद काय करताय. आधी परागच्या मोबाईलवर फोन करून उठवा दोघांना. सकाळचं छान फिरून यावं आणि सुनेने चहाचा वाफाळता कप हातात द्यावा अशी स्वप्नं बघितली होती. विरून गेली चहाच्या वाफेतच. जळलं मेलं आमच्या पिढीचं हे असलंच. आधी सासू होती आणि आता सून मिर्या वाटतेय डोक्यावर". राधाताई फणफणत चहा करायला गेल्या.
"काय बाबा, आज सकाळी सकाळी 'कुरकुरेचा' डोस का?" पराग हसतच हॉलमध्ये आला.
"हम्म.........गूडमॉर्निंग युवराज. आजचं काय कारण उशीरा उठायचं?". चष्म्यातून बघत विश्वासराव म्हणाले.
"काय बाबा, जसं काही तुमचं लग्न नवं नवं नव्हतंच कधी". पराग जरासा लाजतच म्हणाला. तेवढ्यात स्नेहलही आलीच. ती विश्वासरावांच्या शेजारीच मांडी ठोकून पेपर वाचायला बसली तशी मेघनामावशीला थोडासा धक्का बसला. नकळत तिचं मन तिच्या घरातल्या वातावरणाशी तुलना करायला लागलं.
"वॉव काकू, तुमच्या हातची कॉफी प्यायली की दिवसाची सुरुवात इतकी प्रसन्न होते ना..." स्नेहल जरा मस्का मारतच म्हणाली.
"हो नं, मग माझ्या पण दिवसाची अशी प्रसन्न सुरुवात झालेली मलाही आवडेल कधीतरी." राधाताई म्हणाल्या तशी स्नेहल घाईघाईने म्हणाली,"काकू बघा नं परागने आज गजर स्नूझ करायच्या ऐवजी बंदच करून टाकला. काकांनी फोन केला तेव्हा जाग आली. पण प्रॉमिस काकू, मी लवकर उठेन उद्यापासून."
मेघनामावशीला एकसारखं आश्चर्य वाटत होतं. आपल्या घरी सूनेचं आपल्याशी, आपल्या नवर्याशी एवढं मोकळं संभाषण होतं कधी?
"मावशी, श्वेताच्या लग्नाच्या निमित्ताने तू रहायलाच आलीस ते बरं केलंस. आता चांगली आठ दिवस रहा" तिची तंद्री मोडत पराग म्हणाला.
"हो रे बाबा, तुमच्या लग्नाच्या वेळी जास्त राहणं झालं नाही. म्हणून म्हटलं आत्ता जावं पण आठ दिवस कसली राहते रे मी. उद्या श्वेताचं लग्न झालं की दोन दिवसांनी निघेन मी."
"मावशी तुम्ही चांगल्या आठ दिवस रहा. आपण खूप धमाल करू". स्नेहलच्या लाघवीपणाचं मेघनामावशीला कौतूक वाटलं.
"काकू आज डबा नको. तुम्ही काहीतरी खायलाच करा. इंटरव्ह्यूच्या गडबडीत डबा खायला सुचणार नाही. असं करता का तुम्ही उपमाच करा." स्नेहल आंघोळीला जाता जाता राधाताईंना म्हणाली.
"अगं पण मेथी आणलीये मी ठेपले करायला. परागने कालच सांगितलं होतं."
"काकू रविवारी करू नं ठेपले म्हणजे मग मला पण स्वस्थ चित्ताने खाता येतील."
"बरं बाई.." ठेपले खायला चित्त स्वस्थ असावं लागतं असा नविनच शोध आज राधाताईंना लागला होता.
"आई, तू आजकाल माझ्याकडे लक्ष देत नाहीस. सगळे सूनेचे लाड पुरवतेस फक्त." पराग फुरंगटत म्हणाला तेव्हा राधाताई नुसत्याच हसून उपमा करायला गेल्या.
"काकू........." स्नेहल बेडरूम ओरडली तशी राधाताई धावतच बेडरूममध्ये गेल्या. " माझा स्ट्रोल मिळत नाहीये".
"अगं ठेवलाय की तो तुझ्या ओढण्यांच्या कव्हरमध्ये."
"काकू द्या ना प्लीज शोधून. मला आवरायला उशीर होतोय."
"पराग तू जा आता आंघोळीला नाहीतर तुला पण आवरायला उशीर होईल. तुझं काही हरवलं तर मला वेळ नाही शोधून द्यायला" कांदा चिरता चिरता राधाताई म्हणाल्या.
"हेच मी म्हणतोय आई, तुला स्नेहूचं हरवलेलं शोधून द्यायला वेळ आहे पण माझं नाही. लग्न झाल्यावर मी मातृप्रेमाला अगदी पारखा झालोय."
"तू नाटकीपणाने काहीतरी बोलू नकोस हां पराग, मला आत्ता तुझ्याशी भांडायला पण वेळ नाहीये. तुझ्याच बायकोची ऑर्डर पुरी करायचीये. गधडीला एक काम करायला नको. इकडची काडी तिकडे करत नाही घरातली." इति राधाताई.
"तरी बरं आई, तुझ्याच पसंतीने सून आणलीये घरात. माझ्या कोणी मैत्रीणी नव्हत्याच. तू म्हणालीस त्या मुलीशी लग्न केलं की नाही मी?" पराग राधाताईंच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
" हो तर, मीच विकत घेतलेलं दुखणं आहे हे, मला सोसायलाच हवं. आणि तू अगदी आज्ञाधारकच जसा काही. स्नेहूला 'हो' म्हण म्हणून किती विनवण्या केल्या तुझ्या तेव्हा कुठे लग्नाला तयार झालास." पुढच्या नेहमीच्या संवादांची उजळणी होऊ नये म्हणून पराग आंघोळीला पळालाच.
"काकू........" पुन्हा स्नेहल ओरडली.
"आता काय हरवलं तुझं बाई" असं म्हणत राधाताई पुन्हा बेडरूममध्ये गेल्या.
"काकू, हा ब्लाऊज जरा सैल होतोय मला. तुम्ही जरा प्लिज टक्स घालून ठेवा आज. अर्धा इंचच हं.... म्हणजे मला उद्या ही साडी नेसता येईल लग्नाला."
"बरं, तू काल माझा ब्लाऊज आणलास टेलरकडून?" राधाताईंनी विचारलं.
"अय्या काकू, विसरलेच मी. आज येताना घेऊन येते. तुम्ही आज मला सन्ध्याकाळी ५ वाजता आठवण करायला प्लिज फोन करा. आणि आजही मी विसरले ना, तर तुम्ही माझी साडी नेसा ना......" स्नेहल गडबडीने म्हणाली. "पराग चल लवकर... झालं का तुझं खाऊन? मला उशीर होतोय.".
"चल चल लवकर. सगळे डॉक्युमेंट्स ना घेतलेस बरोबर?" पराग शूजची लेस बांधता बांधता म्हणाला.
"पराग, हा तुझा रूमाल आणि स्नेहू, हा तुझा उपम्याचा डबा. विसरत होतीस टेबलवरच. आणि बेस्ट लक गं बाई!! नेहमीसारखा काही गोंधळ घालू नकोस." राधाबताई घाम पुसत म्हणाल्या.
" मॉमी........ यु आर छो च्वीट" असं म्हणत स्नेहल राधाताईंचा चक्क गालगुच्चा घेऊन बाहेर पडली तेव्हा मेघनामावशीला आपल्या बहिणीचा हेवा वाटला.
"तुला सांगतो मेघना, आमची ही चिमणी घराबाहेर पडली की घरात अगदी सामसूम होते." विश्वासराव मेघनामावशीला म्हणाले.
"पण फारच बाई नाचरी पोरगी. लग्नाच्या वेळी मॅच्युअर्ड वाटली होती. राधाताई, ती तुला अगदी सख्ख्या आईसारखी नाचवते." मेघनामावशी उद्गारली.
"असू दे गं, निष्पाप आहे पण अगदी. आता काही काम करत नाही हे खरंय पण लहानच आहे अजून. अंगावर पडलं की करेल आपोआप." राधाताई हात पुसत बाहेर येत म्हणाल्या.
"स्नेहू म्हणजे हीचा अगदी सॉफ्ट कॉर्नर हं मेघना. तिला कोणी काही बोललेलं चालत नाही. मैत्रीणीची मुलगी आहे नं....."
"मैत्रीणीची मुलगी म्हणून नाही पण तिच्याबद्दल अतूट माया जाणवते मात्र मला" राधाताई त्यांचं वाक्य तोडत म्हणाल्या.
तशी विश्वासराव म्हणाले "अगं मेघना, इतक्यात काही आम्ही परागच्या लग्नाचं बघणार नव्हतो. आत्ता कुठे तो २७ वर्षांचा तर आहे. पण हिच्या मैत्रीणीने, नीलाने सहज म्हणून आपल्या मुलीची म्हणजे स्नेहलची माहिती सांगितली आणि तिची जन्मतारीख ऐकून हीने घोषाच लावला की स्नेहललाच आपल्या घरात सून म्हणून आणायची. परागलाही हीने पॉझिटिव्ह विचार करायला भाग पाडलं."
"असं ठरलं होय परागचं लग्न. पण स्नेहलच्या जन्मतारखेचं काय एवढं विशेष?" मेघनामावशीने विचारलं.
" १९८० साल आठवतंय तुला मेघना?" राधाताई म्हणाल्या.
" १९८०.... तुला पहिल्यांदा दिवस गेले होते त्यावेळी. ऑगस्टमधली तारीख दिली होती डॉक्टरांनी...... हो ना गं राधाताई?"
" हो गं. १९ ऑगस्टला मुलगी झाली आणि काविळीचं निमित्त होऊन पाचच दिवसात गेली बिचारी." राधाताई डोळे पुसत म्हणाल्या," मेघना, स्नेहूचा जन्म १९ ऑगस्टचाच आहे गं. देवाने माझी पोरगी परत पाठवलीये माझ्याकडे. अनोखा ऋणानुबंध आहे गं हा."
"काय सांगतेस काय राधाताई..." मेघनामावशी विस्मयाने म्हणाली.
"हो गं... ती मुलगी राहिली असती तर २४ - २५ व्या वर्षी लग्न करून दिल्यावर मी सुटले असते. पण ही स्नेहू आता मी मरेपर्यंत लाड पुरवून घेणार बघ माझ्याकडून...." आपल्या लाडक्या स्नेहूच्या ब्लाऊजला टक्स घालता घालता राधाताई म्हणाल्या.
"खरंय तुझं....." विश्वासराव सुद्धा अगदी समाधानाने हसले.
------------- समाप्त -------------