कधी कधी कसं वागावं
अजिबातच समजत नाही
न वागता तसंच नुसतं
स्वस्थ सुद्धा बसवत नाही----
जे वाटतं हवंहवंसं
हूल द्यायला चुकत नाही
नको नको होणारं ते
नशिबानेही टळत नाही----
मनामध्ये असतानाही
ओठांवाटे उमटत नाही
शब्द जरी जपला तरी
ओठांआड दडत नाही-----
किती जरी जा म्हटलं
ऊन कधी जात नाही
पाऊस सुद्धा हवा तेव्हा
हवा तेवढा कोसळत नाही------
नियतीच्या प्रांतात असतं
सगळीकडे धुकं
डोळ्यांत बोट घालूनसुद्धा
समोरचं सगळं फिकं!