वादळभूमी ३.०

कोणार्कचं सूर्यमंदिर बघायला आम्ही सकाळी लवकरच निघालो. सूर्याच्या रथाच्या आकारात बांधलेल्या आणि बरीच दगडी चाकं असलेल्या या मंदिराबद्दल सर्वांनाच खूप उत्सुकता होती. पोहोचल्यावर सुदैवाने आम्हाला नोंदणीकृत गाईड मिळाला आणि आजपर्यंतच्या ऐकीव अर्धवट माहितीला धडाधड सुरुंग लागायला सुरुवात झाली.

पहिली गोष्ट म्हणजे सूर्याची मुख्य मूर्ती असलेलं मंदिर आता अस्तित्वातच नाही. ते कधीच पडून गेलं आहे. जेव्हा मंदिर बांधून झालं तेव्हा नाट्यमंडप, प्रार्थनागृह आणि मुख्य मंदिर/गर्भगृह अशी त्याची रचना होती. लिंगराज मंदिराच्या गर्भगृहासारखंच एक अतिविशाल शिखरवजा असलेलं मुख्य मंदिर आज हरवून गेलं आहे. बरीच पडझड झालेलं प्रार्थनागृह (assembly hall) पुरातत्त्व खात्यामुळे उभं आहे आणि नाट्यमंडपाचे (dance hall) केवळ खांब उरले आहेत. शिवाय मंदिरात आत जाता येत नाही कारण ते संपूर्ण कोसळण्यापासून वाचवण्यासाठी आतून पूर्णपणे वाळूने भरुन टाकण्यात आलेलं आहे. तरीही आज शिल्लक असलेलं मंदिर दिमाखात उभं आहे आणि त्याचा इतिहासही तेवढ्याच रंजक गोष्टींनी भरलेला आहे.

कोणार्क म्हणजे साधारणत: कोपऱ्यातला सूर्य. अर्क म्हणजे सूर्य. या मंदिराला पूर्वी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ब्लॅक पॅगोडा असंही नाव होतं. गंगा घराण्यातला राजा नरसिंह पहिला याने तेराव्या शतकात हे मंदिर बांधलं. त्यावेळी बंगालपर्यंत वाढवलेलं साम्राज्य आणि एकूणच जोरावर असलेल्या मुस्लिम आक्रमणाला शह म्हणून या मंदिराची निर्मिती करण्यात आली. असं म्हणतात की त्यावेळी जवळजवळ बारा वर्षं मिळेल एवढ्या कराएवढी रक्कम बांधकामासाठी खर्च करण्यात आली. मंदिर पूर्णत्वास गेलं आणि साधारणत: पंधराव्या शतकापर्यंत पूजाअर्चा वगैरे गोष्टी सुरळीतपणे सुरु होत्या. पण सोळाव्या शतकात मुस्लिम आक्रमणाचा जोर वाढला. ओरीसातल्या हिंदू मंदिरांमध्ये मोडतोड सुरु झाली. पुरीतल्या जगन्नाथाची मूर्ती अज्ञात स्थळी हलवल्याचं पाहून कोणार्कच्या पंड्यांनीदेखील मूर्ती वाचवण्यासाठी नाहीश्या करुन काही दिवसांनी पुरीला हलवल्या. पण याचा अगदी उलटा परिणाम घडून आला. दिवस पुढे जात राहिले आणि मूर्तीच नसल्याने कुणीच इकडे फिरकेनासं झालं. लोकांचा राबता बंद झाला आणि मंदिराची हेळसांड सुरु झाली.

अठराव्या शतकापर्यंत मंदिर अगदी निर्जन, ओसाड होऊन गेलं आणि निसर्गाचा अंकुश सुरु झाला. झाडाझुडपांनी, वेलींनी मंदिराचा कब्जा घेतला. अवस्था एवढी बिकट झाली की स्थानिक लोक देखील दिवसाउजेडी मंदिर परिसरात जायला घाबरू लागले. मंदिराची अपरिमित हानी झाली आणि बराच भाग कोसळला. असं म्हणतात की इंग्रज राजवटीत इथल्या जवळपासच्या परिसराचा प्रमुख असलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याने (नाव विसरलो) मंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न केले तोपर्यंत मंदिराची अवस्था कधीही कोसळेल इतपत बिघडली होती. त्याने मंदिराला आतून आधार देण्यासाठी मंदिराचे सर्व दरवाजे बंद करुन वरच्या बाजूने मंदिराला छिद्र पाडलं आणि वाळूने संपूर्ण मंदिर भरुन टाकलं.

१९०३ मध्ये मंदिराची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. आज पुरातत्त्व खात्याने मंदिर पूर्वीसारखं भक्कमपणे उभं केलं आहे. निखळण्याच्या बेतात असलेले सर्व भाग काढून नवीन दगडांनी त्या जागा भरून काढण्यात आलेल्या आहेत. मंदिराला १९८४ मध्ये जागतिक वारसा म्हणून किताब मिळाला. पण अगदी इंच इंच जागा लढवून कलाकुसर केलेल्या पूर्वीच्या मंदिरात बहुतांश ठिकाणी बदललेले दगड पाहून नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही.

स्थानिकांनी तर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ला नावंच ठेवली आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी दगड बदलताना वेगळ्याच रंगसंगतीचे दगड आल्याने विसंगती लगेच जाणवते, शिवाय दगड बसवण्यासाठी वापरलेलं गुलाबी सिमेंट स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे पूर्वीचं मुख्य मंदिर कसं असेल याबाबत कितीही तर्क लढवले तरी काहीच उत्तर सापडत नाही. १८०९ मधलं, १८४७ मधलं जेम्स फर्गसनचं एक जलरंगातलं चित्र आणि कॉर्निशची १८८० मधली काही प्रकाशचित्रं आज सुदैवानेयेथेउपलब्ध आहेत. पण ती देखील अंदाज बांधण्याकरता खूपच अपुरी आहेत.

कोणार्कच्या मंदिराला एकूण चोवीस चाकं होती. दोन बाजूंना बारा याप्रमाणे. बरीच पडून गेली, अर्धवट चाकं पुरातत्त्व विभागाने पूर्ण केली आणि ती सोडली तर केवळ एकच चाक मूळ पूर्णावस्थेत आहे. सूर्याचा प्रकाश आणि सावली पाहून प्रत्येक चाकावरुन दिवसातलं घड्याळ कळतं त्याप्रमाणे गाईडने मोजलेली वेळ आणि खरी वेळ यात साधारणत: अर्धा पाऊण तासाचा फरक दिसला. बारीक कलाकुसरीबरोबरच आफ्रिकेहून भेट दिलेला जिराफ, चिनी प्रवासी, समुद्रमंथन, उंच टाचांची पादत्राणे घालून नाचणारी नर्तिका वगैरे शिल्पे गाईड दाखवतो. मंदिर बांधताना दगड वाहून आणणारे पुरुष, शेजारीच चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया शिल्पांमध्ये दाखवल्या आहेत.

शिवाय दर्शनी भाग सोडून उरलेल्या तीन दिशांना सूर्याच्या अनुक्रमे सकाळ, दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळच्या तीन मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. सकाळचा उत्साह, दुपारचा धीरगंभीर भाव चेहऱ्यावर ठळकपणे दिसतोच मात्र संध्याकाळचा रडकुंडीला आल्यासारखा थकलेला सूर्य आणि कधीही मान टाकेल असा त्याचा घोडा सगळ्यात छान वठला आहे.या मूर्ती वेगळ्याच क्लोराईट दगडात घडवल्या आहेत आणि कलाकुसर एवढी बारीक आहे की सूर्याच्या अंगावरचं वस्त्र देखील दिसून येतं.

कोणार्कचं मूळ मंदिर का पडलं असावं याबाबत बऱ्याच दंतकथा आहेत. म्हणतात की पूर्वी मुख्य मंदिराच्या वर एक अतिशय मोठा चुंबकीय गोल होता, ज्याच्या सहाय्याने मंदिराचा गुरुत्त्वमध्य साधला होता पण पुढे या गोलामुळे जवळून जाणार्या जहाजांवरील होकायंत्रात बिघाड होऊन ती भरकटल्याने नाविकांनी तो काढून टाकला, यामुळे तोल ढासळल्याने मंदिराची पडझड झाली. काहींच्या मते तांब्याचा एक मोठा कलश होता जो सोन्याचा वाटल्याने लोकांनी खाली पाडला.

गाईडच्या मते मात्र या कथा खोट्या असून त्यांचा काहीच पुरावा नाही. मुस्लिम आक्रमणातील तोडफोड, मूळ बांधकामातील त्रुटी, व एवढ्या वजनाला पेलण्याची क्षमता असलेला विस्तृत पाया नसल्याने मंदिर पडलं हे खरं कारण असावं. याबाबत गाईडमुळे बरीच मोलाची माहिती मिळाली. अन्यथा भारतातल्या जवळजवळ सर्वच ठिकाणचे गाईड कुठेही मोडतोडीचा संबंध आला की लॉर्ड कर्झनचं तुणतुणं वाजवतात असं माझं निरीक्षण आहे.आणि मंदीर बघताना एका घोळक्याजवळून जाताना खरंच लॉर्ड कर्झनचा उल्लेख ऐकू आला.

२००७ मध्ये कोणार्क मंदिराची दुरुस्ती करुन ते आतूनही बघण्यासाठी आतली वाळू काढण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला, त्याची बातमीयेथेवाचता येईल. भारत सरकारने यासाठी मध्यंतरी जागतिक निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार सिंटेक इंटरनॅशनलला हे काम देण्यात आले आहे.इथेपहा. या कामाअंतर्गत सध्या दुरुस्तीचे काम सुरु असून एका बाजूने लोखंडी सांगाड्याने मंदिराला आधार देण्यात आला आहे.

काम पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा आतून मंदिर पाहण्यासाठी भेट देण्याचा मी नक्कीच विचार करेन. कित्येक शतकांचा इतिहास पोटी बाळगणारं आणि इतका रंजक इतिहास असणारं हे मंदिर प्रत्येकाने आयुष्यात जरुर बघावं.

"here the language of stone surpasses the language of man." असं रविंद्रनाथ टागोरांनी कोणार्कच्या केलेल्या वर्णनात काडीचीही अतिशयोक्ती नाही.

-सौरभ.


(कोठल्याही चित्रावर टिचकी मारून ते चित्र मोठ्या आकारमानात पाहता येईल. : प्रशासक)