आज स्वारी.. लवकर ??
मनीनं दरवाजा उघडत विचारलं
हो, गं.... मिंटीग्स आज लवकरच आटपल्या !
चला म्हणजे, आज सगळे एकत्र तरी जेऊ....
हो... राणीसरकार आज तुम्ही म्हणाल तसं...!!
पुरे पुरे, हा...फ़्रेश होऊन या तोपर्यंत मी पोळ्या! लाटून घेते....
बरं.....म्हणत बॅग ठेउन मी बाथरुमकडे मोर्चा वळवला.....
फ़्रेश होऊन मस्त बातम्या पहायचा मुड झालेला....दिवसभर ऑफ़िसमध्ये, कामाच्या टेंन्शन्समध्ये थोडाही निवांतपणा मिळत नाही. नुसती धावपळ चाललेली असते..धकाधकीच्या या जगण्यात विसरुनच गेलोय की 'आपण जगण्यासाठी काम करतोय, काम करण्यासाठी जगत नाही'....
काय ???? राहुलसाहेब काय चाललयं??
कुछ नही डॅडी, बस युंही.........टीव्ही देख रहा हूं...
अरेरे...अरे मी मराठी, मग तुही मराठीच ना...? मातृभाषेचा जरातरी आदर ठेव रे...कमीतकमी घराततरी मराठी बोलवं....
काय हो..बाबा स्कुलमध्ये टीचर्स म्हणतात मराठीचा वापर कमी करा...! मग आता कुणाचं ऐकायचं??
तुझ्या टीचर्सना घाल चुलीत...आणि तो रीमोट दे इथे......
हेच राहु द्या बाबा...चेंज नका करु..... आता मस्त फ़ाईटींग होणार आहे ट्रीपल-एच आणि रॉक मध्ये....
अरे राजा, ह्या वयात हे असलं काही पहायचं नसतं.....
मग काय पहायचं????
अरे डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफ़ी, ऍनिमल प्लनेट असे चॅनल्स पाहायचे की हे असलं काहीतरी....ज्यातुन काहीतरी घेण्यासारखं, शिकण्यासारखं मिळतं....अश्यागोष्टी पहायच्या.....
ओके डॅड .....!!
अरे, परत तेच.....
सॉरी बाबा.....म्हणतच राहुल बेडरुममध्ये गेला.....
चॅनल सर्च करताना सहजच घड्याळाकडे नजर गेली साडेनऊ होत आलेले सह्याद्रीवरच्या बातम्यांची वेळ झालेली.....सरळ १ नंबरच बटण दाबुन मी सह्याद्री चॅनलवर आलो...बातम्या नुकत्याच चालु झालेल्या आज बातमीदार प्रदिप भिडे होते माझे आवडते निवेदक...... ठळक बातम्या चालु झाल्या होत्या....पहीलीच बातमी "आज शेयर बाजाराने आजपर्यंतचा सगळ्यात निच्चांक गाठला"
बातमी ऐकताच धडकी भरली....म्हणजे आज दिवसभर मार्केट डाऊन होतं....
राजेशचा जबरदस्त लॉस झाला असेल...तरीच ११ वाजल्यापासुन राजेश ऑफ़िस मध्ये दिसत नव्हता...मघाशी मिंटींगलाही आला नाही.....
आज काही खरं नाही............आता रात्री हा नक्की डोकं खाणार.....
राजेश....राजेश माझा बिझनेस पार्टनर, ’मिस्टर राजेश देशमुख’ पण सध्या शेयर मार्केट मध्ये त्याला चालु बिझनेसपेक्षाही जास्त इंटरेस्ट आहे.....मागील काही महिने साहेब ऑफ़िसमध्ये क्वचितच दिसतात....सगळा भार आमच्या खांद्यावर टाकुन निवांत ब्रोकरच्या ऑफ़िसला बसुन असतो.....
टेबलावरच्या फ़ोनची रिंग वाजली....ही पहीली घंटा... अजुन प्रयोग सुरु व्हायचाय....आज काय होणार ??कुणास ठाऊक???
स्वत:शीच म्हणत मी रीसीव्हर उचलला.....
हॅलो, सुरेश लवकर खाली ये....!!
का ??रे काय झालं???
काही नाही तु आधी खाली ये, मग सांगतो.....
बर आलोच......थांब...
फ़ोन ठेउन मनीला आवाज देत म्हणालो...
मने, जरा खाली राजेश कडे जाउन आलो....उशीर झाला तर जेऊन घ्या....
काय हो?? निदान आजतरी तिघही एकत्र जेवलो असतो....
हो गं, माहिती आहे मला....मी येतो जाउन.....
लिफ़्टने न जाता मी जिन्यानं खाली उतरत ४थ्या मजल्यावरच्या राजेशच्या घरी गेलो...
कीती?
काय कीती?
कीती ??लॉस कीती आजचा......?
न्युज पाहीलीस वाटतं...
हो आत्ताच.....कीती झाला लॉस
"आठ लाख"
काय????
हो... यार आठ लाख बुडाले आज मार्केट खुपच खाली गेलं आज....
आता काय उपयोग तोंड पाडुन...व्हायचं ते होणारच हातच सोडुन पळत्याच्या मागं लागलं ना की हे असच होतं. तुला मी सांगितलेलं पटत नाही. आणि हो आज मी तुझं रडगाणं ऐकायला ईथं थांबणार नाही..हे बघ राजेश, शेयर मार्केट मध्ये एंट्री करण्यापासुन ते आजपर्यंत मी तुला तुला हजारदा समजावलं आणि आज तर तेही करण्याची माझी इच्छा नाही, तुझा फ़ोन आलेला तेव्हाच मी ठरवलयं. ह्या असल्या जुगारावर विचार करायला मी माझा वेळ घालवणार नाही...
अरे.... पण हा जुगार कुठे आहे...हाही एक बिझनेसच आहे....
कोण म्हणतं हा बिझनेस आहे....?
अरे सगळेच तर म्हणतात...यात सर्वात फ़ास्टेस्ट ग्रोथ आहे...
आणि फ़ास्टेस्ट रीग्रेशनही....मित्रा मला नाही वाटतं हा बिझनेस आहे....
मला हा "सभ्य आणि मोठ्या माणसांसाठीचा कायदेशीर जुगार" वाटतो....ज्यांना पैश्यांची कींमत नसते, अश्या व्यक्ती ह्या असल्या जुगारात आपला पैसा टाकतात...ही मोठ्या लोकांची कामे आहेत साहेबा....जो आपल्या मेहनतीचा पैसा कमवतो ना त्याला त्या पैश्याची कींमत माहीत असते....झटपट पैसा कमवण्यासाठी आपल्या मेहनतीच्या पैसा यात टाकणा-यांना काय म्हणतात हे मी तुला सांगायला नको....!!
तुला काय म्हणायचय ??? मला माझ्या पैश्यांची किंमत नाही....????
अर्थात नाहीच...नाहीतर तु ह्या असल्या लफ़ड्यात पडलाच नसता....
अरे पण मी....
तुला आता तु करतोयस ते ठीक वाटतय....कारण तुझ्यावर जबाबदा-या नाहीत म्हणुन तु ह्या फ़ास्टेस्ट ग्रोथ च्या मागे लागला आहेस.....अस्थिरतेच्या भोव-यात अडकलायस तु..... तुला स्थिरतेच महत्व आता कळणार नाही.....तु समाधानाच्या पलीकडे गेलायस....
"अस्थिरता आणि स्थैर्य यातला फ़रक पारदर्शक आहे रे.....अगदी दिवस आणि रात्र यांच्यातल्या फ़रकाएवढा.....दिवस जरी तेजस्वी प्रकाशाचा असला तरी त्याचं अस्तित्व मात्र ठोस नसतं.....अस्वस्थता, धावपळ, धकाधकी यामध्ये कमी-जास्त होणा-या प्रकाशाचं आणि त्याचबरोबर आपल्या फ़रफ़टणा-या आयुष्याचं भान..आपल्याला नसतं....त्याउलटची रात्र......जी आपल्याला फ़क्त अंधार देते पण तिचं अस्तित्व मात्र ठळक असतं, अंधार म्हणजे शीतल अन शांत अस्तर मित्रा.....ज्याच्या स्पर्शानेच आपल्याला समाधान, सुख सहज मिळतं....सुख, समाधान हेच हवं असतं ना आयुष्याकडुन की दुसरं काही....?"
मला गती हवी आहे!! मला....माझ्या आयुष्याला...
हो राजेश...पण ते मिळवण्याचा हा मार्ग कुठला.....? अजुन सांगतो राजेश "बाई, जुगार आणि दारु" या तिन्ही गोष्टींच्या नादाला शहाण्या माणसाने कधीच लागु नये...या गोष्टी माणसाला मोहाच्या जाळ्यात अडकवतात....ह्यातल्या प्रत्येक गोष्टीला आकर्षितेचं वरदान आहे....या गोष्टी बाहेरुन जितक्या उठावदार दिसतात ना तितक्याच आत कुरुप असतात....आणि यांची उपज म्हणजे ’वासना, पैसा आणी नशा’ या तिन्ही गोष्टींकडुन मिळणारं सुख क्षणिकचं, एका ठराविक वेळेपुरतचं, आणि यासाठी आपण सारं काही पणाला लावणं हे कितपत योग्य आहे?
अरे पण यात गैर असे काय आहे.....??? क्षणिकच असलं तरी सुख मिळतेच ना??? राजेशचा आवाज आता वाढला होता.....
ह्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मर्यादेपलीकडल्या आहेत...मित्रा...यांच्यापासुन जितका दुर राहशील तितके तुझ्यासाठी चांगले...
"आयुष्यात याच गोष्टी महत्वाच्या नसतात...माणसानं विवेकानं जगावं मित्रा." हा "विवेकच तुझा खरा मित्र असतो". उद्या कदाचित तुझ्या सोबतीला असेन वा नसेनही...पण तुझा हा मित्र तर नक्कीच शेवटपर्यंत तुझ्यासोबतीला असेल. त्याचे सल्ले घेत रहा, मग सुख, शांती समाधान मिळवायला तुला ह्या असल्या गोष्टींच्या मागे धावण्याची गरज नाही....
माझ्या मैत्रीच कर्तव्य मी केलं या पुढचा निर्णय सर्वस्वी तुझाच असेल....चल मी निघतो आता...मनी आणि राहुल जेवायला वाट पाहत आहेत.....
ओके.....यार सकाळी ऑफ़िसमध्ये भेटू....गुड नाईट....
गुड नाईट.........
जिने चढताना सहज मनात विचार आला.....
"प्रकाशापेक्षा मी अंधाराचं समर्थन मी इतके का करतो....याचा अजुनही मला उलगडा झाला नाही...सगळी दुनिया प्रकाशाकडे धाव घेत असताना, मी मात्र एकट्या त्या अंधाराच्या सोबतीला राहतो. माणसानी गरजेपुरतंच मिळवावं, का? सुख, शांती, समाधान अश्या गोष्टींच्या पलीकडे जाउन काहीतरी खटाटोप करुन, कुठल्याही मार्गांचा अवलंब करुन, गरजेपेक्षा जास्त मिळवावं आणि अस्वस्थता, चिंता, काळजी यांच्या विळख्यात उगाच अडकावं. दुनिया ह्यातल्या दुस-या प्रकाराला प्रगती म्हणते....’प्रगती’.....प्रगती म्हणजे गतीचं भान ठेवत, तिच्याशी समांतर चालत आपल्या आयुष्याचा, आपल्या राहणीमानाचा विकास करणं का? गतीलाही मागे टाकुन, तिच्या सुत्रांना आपण स्वत:च आपल्या स्वार्थासाठी न जुमानत, आपण तिच्या पुढे जायचं? कदाचित सगळ्यांच्या मते मी चुकत असेनही...पण माझ्याबरोबर ही गती, वेळ, नियतीचे नियम सगळेच चुकीचे कसे ठरु शकतील?"
-सचिन काकडे [ मार्च ४,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच " हा खेळ सावल्यांचा"