ती आली, तिने पाहिलं.. आणि तिने जिंकलं..

मंडळी, आमचं माहेर समस्त प्राणिमात्रांचं घर. समस्त प्राणिमात्रांचं याचा शब्दशः अर्थ सगळ्या प्राण्यांचं(पाळीव) आणि माणसांचं. म्हणजे घरात प्राणी हे हवेतच.  कायम वस्तीला असलेले प्राणी म्हणजे २ कुत्री आणि १ मांजर आणि असलंच तर त्या मांजरीची पिल्लं. माझ्या लहानपणी आम्ही इचलकरंजी इथे डेक्कन कॉ.ऑप.मिल्स च्या क्वार्टर्स मध्ये राहत होतो. तिथले माझे बालपणीचे दिवस म्हणजे खरं सांगायचं तर सुवर्ण अक्षरात लिहावेत असे दिवस होते. एक घर आणि घराबाहेर बाग, त्या बागेत एक मोठे पायरी आंब्याचे झाड, एक मोठे फणसाचे झाड, सीताफळ,पपई आणि काही फुलांची झुडुपे... बाग छोटी असली तर मला खूप आवडायची. तर माझ्या या घरी ससे पाळले होते आम्ही. बाबांचा विरोध होता तरीही पाळले. आणि या सस्यांचा पिंजरा बागेत ठेवला होता. एक पोपटही होता पाळलेला. कुत्रा आणि मांजर तर होतेच. म्हणजे आमचे घर जरा कमी प्राणिसंग्रहालय होते असे म्हटले तरी चालेल.  माझ्या बाबांना, कुत्र्या खेरीज बाकी प्राणी विशेष आवडत नाहीत. पण मेजॉरिटी मुळे त्यांचे काही चालत नसे. त्यात एकदा मी कहरच केला. तिथे रोज सकाळी एक मिलचा माळी सगळ्या घरातून फुले आणि दूर्वा वाटत हिंडत असे. आणि रोज तो दूर्वा ठेवून गेला की मी लगेच त्या दुरावा सशांना खायला घालत असेल. आजीला पूजेसाठी दुरावा मिळत नसत. बिचारा माळीबुवा रोज शिव्या खाई आजीच्या. आणि एकेदिवशी साक्षात बाबांनी मला रंगेहाथ पकडले. आणि मग मस्त खरडपट्टी... तशातच एकदा आईचा पाय दुखावला, तिला चालताही येईना. सस्यांकडे बघायला कोणी नाही.. त्यामुळे त्यांना त्याच माळीबुवांच्या शेतावर ठेवण्यात आलं आणि माझं ससे पाळण्याचं स्वप्न धुळीला म्हणजे धुळीलाच मिळालं.  त्यांतर काही काळाने कोल्हापुराला मोठ्ठ ... हो मोठ्ठच घर बांधलं आम्ही आणि सगळे तिकडे राहायला गेलो. लहानपणापासूनची सवय त्यामुळे २ कुत्री आणि मांजर आमच्यासोबत तिथेही आलेच. फक्त आता पोपट आणि ससे नव्हते...... ही प्रस्तावना होती माझे प्राणीप्रेम सांगण्यासाठी.

तर अशा या आमच्या घरी, दिवाणखान्यात एकदा मी (वर वर्षे १७) तंगड्या पसरून सोफ्यावर झोपून टी.व्ही. पाहत असताना... अचानक त्या मोठ्या खिडकीतून फडफड आवाज करत एक चिऊ (चिमणी) आली. सगळ्या दिवाणखान्यात भुर भुर फिरून ती पंख्याच्या एका पात्यावर बसली. माझ्या पायाशी बसलेल्या आमच्या कुत्रीने तिच्याकडे बघून गुर्रर्र.. असे केले. मी तिला डोक्यावर थोपटून शांत केले.  वर पाहिले तर चिमणी माझ्याकडेच पाहत होती.  मी स्मित का काय म्हणतात ते हास्य केले.. बहुतेक तिला ते समजले असावे कारण पटकन उडून ती खिडकीतून बाहेर गेली... (मला थोडे वाईट वाटले) .. पण लगेचच दुसर्‍या मिनिटाला ती परत आली तिच्यासोबत आणखी एक चिमणी होती. बहुतेक चिमणा असावा.. अंगाने जरा बरा होता म्हणून मी अंदाज बांधला. पुन्हा दोघे त्याच पंख्याच्या पात्यावर बसले. यावेळी कुत्रीने गुर्रर्र.. नाही केले(किती शहाणी!).  मग त्या दोन चिमण्या सगळ्या घरभर नुसत्या भिरभिरत होत्या.  मला त्यात काही वेगेळे वाटले नाही. त्या भिरभिरल्या आणि गेल्या निघून.

दुसरे दिवशी बरोबर त्याच वेळी तीच चिमणी आली.. सोबत नवरा नव्हता. पुन्हा सगळ्या घरभर फिरली आणि भिंतीवर असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या फोटोच्या वरती जाऊन बसली. दर्शन घेत असावी बहुतेक गणपतीचे.  तिथे बसली काही काळ आणि निघून गेली. तिसर्‍या दिवशी मी आणि बाबा काहीतरी गप्पा मारत बसलो असताना ती चिमणी आली. आली ती एकदम गणपतीच्या फोटोवरच जाऊन बसली. मी कुतूहलाने तिच्याकडे पाहिले..... तर.. तोंडात ..सॉरी चोचीत , काही गवताच्या काड्या, पिसं असं बांधकामाचं सामान होतं. अरे व्व्व्वा! माझं मन एकदम प्रसन्न झालं. पण लक्षात आलं की बाबा आहेत घरात. बाबांचं तिकडे लक्ष जाण्या आधीच मी बाबांना, " तुम्हाला आजी बोलावते आहे" असं सांगितलं. "हो का?" असं म्हणत उठत असतानाच नेमकं लक्ष त्या चिमणी कडे गेलं आणि तिचा इरादा लक्षात आल्यावर त्यांनी  गोंधळ सुरू केला. "अगं (आईला), हे बघ चिमण्या इथे घरटं बांधताहेत.. हाकल त्यांना. नको हे काहीतरी.. अगं.. ए... कुठे आहेस? झाडू आण, त्या चिमणीला हाकलतो मी." त्यांनी झाडू घ्यायच्या आधीच, त्यांच्या दंग्याने ति बिचारी (चिमणी) बाहेर भुर्रर्र.....

त्यानंतर पुढे दोन दिवस ती चिमणी काही आली नाही घरी. लालूच म्हणून मी खिडकीत, तांदूळ ठेवले, पाणी ठेवलं..ज्वारीचे दाणे ठेवले ..पण चिमणी काही दिसेना. बाबांमुळे चिमणी बेघर झाली असा विचार करून मी माझ्या इतर व्यवहारात गुंतले.  आणि लगेचच २ दिवसांनी पुन्हा ती चिऊ, चोचीत काड्या घेऊन खिडकीत हजर. मी एकदम खूश झाले. खिडकीच्या गजावर बसून ती काहीतरी इकडे तिकडे पाहत होती. बहुतेक बाबा घरांत नाहीत याचा अंदाज घेत असावी. "अगं चिऊताई, बाबा नाहीयेत घरांत.".. मी.     जणू माझं बोलणं समजल्या सारखी ती आत आली आणि पुन्हा एकदा मुक्काम गणपतीचा फोटो.  फोटोच्या मागे जाऊन त्या काड्या ठेवून ती पुन्हा बाहेर गेली. मला आता खूप खूप बरं वाटू लागलं. चिमणी घरटं बांधणार, त्यात मग अंडी घालेल, त्या अंड्यातून इवले इवले चोच असलेले मांसाचे गोळे बाहेर येतील, त्यांना हळू हळू पंख येतील. चिमणी त्यांच्या चोचीत दाणे भरवेल... आपली इवलिशी चोच उघडून ते दाणे खातील.. हळू हळू ती पिलं मोठी होतील.... आणि कधीतरी एकदा भुर्रकन उडून जातील. आपण त्या पिलांचे घरट्यातले फोटो काढू... चिमणी नसताना आपण त्यांच्या घरट्यात थोडे तांदुळाचे दाणे ठेवू... अशी स्वप्नं मी रंगवू लागले.  संध्याकाळी बाबा आले घरी आणि आत आल्या आल्या त्यांना गणपतीच्या फोटोच्या इथे खाली जमिनीवर काही काड्या आणि पिसे पडलेली दिसली... झा...लं!  त्या ज्या काही १-२ काड्या होत्या त्या सुद्धा घराबाहेर गेल्या. खूप समजावून सुद्धा बाबा ऐकत नव्हते. मला म्हणाले," घरांत मांजर आहे, ती पिलं झाल्यावर मांजराने मारून टाकली तर??? " ... या विचाराने एकदम शहारा आला. मी नाद सोडून दिला.

त्यानंतर २ दिवस तरी चिमणी पुन्हा नाही दिसली. मी मनांत म्हटले,'ठीक आहे नाही आलेलीच बरी. बाबा सांगतात ते ही काही चुकीचे नाही.' आणि मी स्वतःची समजूत घालून माझे कॉलेज, क्लासेस.. इ. मध्ये गुंतून गेले. त्यानंतर २ दिवसांनी आम्ही कोंकणांत जाणार होतो. निघताना, आईने मला सांगितले, "पाठीमागचे दार, सगळ्या खोल्यांतल्या खिडक्या, आणि गच्चीचे स्लाईंडिंग दार बंद आहे ना बघून ये." असे म्हणून माझ्या हातात कुलूप किल्ली देऊन ती बाहेर गाडीत बसायला गेली. मी सगळी दारे खिडक्या बंद आहेत हे पाहिले. मागचे दार बंद केले. मागच्या दाराला आमच्या ग्रिल आहे. ते बंद करून कुलूप घातले. आणि त्याच्या आतले जाळीचे दार ओढून घेताना... का कोणास ठाऊक ते बंद करावेसे नाही वाटले. मी ते पूर्ण बंद नाही केले थोडीशी फट ठेवली... थोडीशी.. अगदी थोडी... एक चिमणी जाण्याएवढी... :)

आम्ही सगळे कोंकणांत गेलो. तिथे वेळणेश्वरचे दर्शन घेऊन , समुद्रावर खेळण्यात मी त्या चिमणीला अगदी विसरून गेले. दोन दिवस अगदी मजेत गेले. दुसर्‍यादिवशी रात्री उशिरा सगळे घरी परतलो. येताना जेवूनच आलो होतो त्यामुळे आल्या आल्या सगळेच निद्रादेवीच्या अधीन झालो. सकाळी  जाग आली ती घरातल्या दंग्यामुळे. उठले आणि बाहेर आले. बघते तर सगळे जण त्या गणपतीच्या फोटोखाली उभे राहून काहीतरी घोळ घालत होते तिथेच खाली पिसं, काड्या पडलेल्या दिसत होत्या.  मला शंका अलीच. मी तिथे गेले.. आणि फोटोच्या एका बाजूने काही दिसते का ते पाहू लागले. मला काय दिसले असेल.... चक्क घरटे.. पूर्ण नाही दिसले पण .. हो.. ते घरटेच होते. २ दिवसांत चिऊताईंनी घरटे बांधून पूर्ण केले होते. मी बाबांना म्हणाले,"बघा दोन दिवसांत तिने घर पूर्ण केलं बांधून, नाहीतर तुम्ही .. आपलं हे घर बांधायला १० महिने घेतलेत".. बाबांनी माझ्याकडे एक असहाय कटाक्ष टाकला आणि ते अंघोळीला गेले. ते गेल्यावर लगेच मी स्टूल आणले आणि ते घरटे पाहिले, चिमणी नव्हती त्यात, पण २ अंडी मात्र होती, राखाडी रंगाची.  आता माझे स्वप्न पूर्ण होणार या आनंदाने मी हुरळून गेले. पण लेगच बांबांच्या कडे जाऊन म्हणाले,"बाबा, घरट्यात अंडी आहेत. तुम्ही काळजी करू नका, आपल्या मनी(मांजर)पासून मी नक्की त्यांची काळजी घेईन." आणि त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...

- प्राजु