मृत्यु आणि मृत्युंजय

आज दिनांक २३ मार्च, आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ७७ वा हौतात्म्यदिन. ध्येयाप्रत समर्पित जीवन आणि हौतात्म्य याचा एक नवा आदर्श या त्रिमूर्तीने निर्माण केला. bhagatsingh

raj sukhdev

या काळात हे तीन वीर व विशेषत: सरदार भगतसिंह हे हिंदुस्थानच्या जनतेच्या गळ्यातले ताईत झाले होते. अर्थात प्रस्थापित नेत्यांना ते परवडणारे नव्हते. त्यांना हिंसक ठरवून त्यांचा धिक्कार करणाऱ्यांनी त्यांच्यावर चालविण्यात आलेला अभियोग हा अत्यंत अयोग्य पद्धतिने, न्यायपद्धतिला हरताळ फासून व या तिघांना फासावर लटकावायचेच असे मनोमन ठरवून चालविण्यात आला याविषयी मात्र ’आळी मीळी गुपचिळी’ हे सोयिस्कर धोरण स्विकारले. किमान सत्याचा उदो उदो करणाऱ्या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणाऱ्या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते. या घटनेनंतर सुमारे पंधरा वर्षांनी म्हणजे जेव्हा सत्तेचे सिंहासन अगदी जवळ आले होते आणि त्याप्रत लवकरात लवकर पोचुन तसेच त्यामार्गे भरघोस लोकप्रियता मिळविण्यासाठी आझाद हिंद सेनेच्या वीरांची वकिली करण्यासाठी (भुलाभाई देसाई प्रभृतिंच्या अधिपत्याखाली का होईना)  वकिली झगा चढविणारे नेहेरु मात्र या वेळी गांधींना दुखावणे हे आपल्याला पेलणारे नाही, उद्या सत्ता मिळेल तर ती गांधीकृपेनेच हे धूर्तपणे ओळखून होते.

मुळात या तिघांवर दाखल केलेला अभियोग हा हत्येचा नव्हता तर ’राजद्रोहाचा, सरकार उलथुन टाकण्याच्या प्रयत्नाचा’ होता हे त्यांच्या वरील आरोपपत्र वाचताच लक्षात येते. या आरोपपत्राचा सारांश असा:

"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकायांसह १९२४ सालापसून ते अटक होइपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले  सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.

हे उद्दीष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून हि उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी ’हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ व ’हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून  त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आअणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढिल मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला:-

१) बॅंका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.
२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॉंब व स्फोटके यांची निर्मिती करणे.
३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे सहाय्यक वा पक्षपाती असणाया पोलिस वा इतर अधिकायांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टात खंड पाडणाया तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे.
४) आगगाड्या उडवीणे
५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वांग्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे
६) वैध बंदिवासातुन दंडितांची व इतरांची सुटका करणे
७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे व
८) हिन्दुस्थानात क्रांती घडवुन आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तिंकडुन वर्गणीच्या रुपात पैसा गोळा करणे."

सदर आरोपपत्र वाचताच प्रत्य्रेक भारतियाची मान अभिमानाने उंचावेल, कि स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होवुन गेला.

या वीरांना कुणाच्या टिकेचे वा असूयेचे यत्किंचितही सोयर सुतक नव्हते. ’आपण अवलंबिलेला हिंसक मार्ग चुकिचा आहे व आपल्याला केल्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे’ असे जाहिर करण्याच्या बोलीवर नेहेरुंनी त्यांची रदबदली करण्याचा प्रस्ताव या हौतात्म्याला आसुसलेल्या तरुणांना तुरुंगात धाडला होता. मात्र नंतर उत्तर देउ असे मोघम उत्तर देत सरदार भगतसिंगांनी त्याक्षणी त्या नेत्यांवर कसलीही टिका केली नाही व त्यांचा अवमानही केला नाही हा त्यांचा खरोखरच मोठेपणा मानावा लागेल. मात्र दिनांक ३ मार्च १९३१ पर्यंत ’दयेचा अर्ज’ करण्याची मुदत असल्याचा फायदा करून घेत ’मृत्युचे निवेदन’ मात्र सरकारला सादर केले.

या तेजस्वी निवेदनात त्यांनी असे निवेदित केले होते की

"आमच्या विरुद्ध इंग्लंडचे बादशाह पाचवे जॉर्ज यांच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.आणि न्यायालयने आम्हाला त्या साठी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हा इंग्लंड नि हिंदुस्थान या दोन राष्ट्रात युद्ध सुरू आहे आणि आम्ही युद्धबंदी आहोत हे उघड होते. आमच्या काही पुढाऱ्यांना सवलती देउन तुमच्या सरकारने आपल्या बाजुला ओढले नि त्यांनी तरुणांचा विश्वासघात केला याची आम्हाला चिंता नाही. ज्या स्त्रियांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली आहे, पतीचे बलिदान दिले, भावाचा बळी दिला नि स्वत:चाही होम केला त्या आमच्या पार्टीच्या सदस्य आहेत म्हणून त्यांना त्या ’हिंसेवर विश्वास ठेवतात’ असे सांगुन हे राजकिय पुढारी आपल्या शत्रू समजतात. त्याचेही आम्हाला दु:ख नाही. पण तरीही हे युद्ध सुरुच राहील. स्वतंत्र आणि समाजवादी प्रजासत्ताक राज्य स्थापित होईपर्यंत हे युद्ध भडकतच राहील. आमचे बलिदान जतिंद्रनाथ  नि भाई भगवतीचरण यांच्या बलिदानाने उज्ज्वल केलेल्या इतिहासाचा अध्याय मोठा करील. आपण आम्हाला फासावर लटकाविण्याचा निश्चय केलेला आहे, व तसे करणारच! आम्ही कधी आपलयाला विनंती केली नाही किंवा दयेचे भीक मागीतली नाही.

आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती अशी की तुमच्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही युद्ध पुकारले होते व म्हणुनच आम्ही युद्धबंदी आहोत. तेव्हा आम्हाला युद्धाबंद्यांप्रमाणेच वागविण्यात यावे अशी आमची मागणी आहे. तुमच्या न्यायालयाने जे म्ह्टले तेच तुम्हाला मनापासून म्हणायचे होते हे सिद्ध करणे आणि ते कृतिने सिद्ध करणे हे आता तुमच्याच हाती आहे! आमची तुम्हाला अगदी मनापासूनची एक विनंती आहे आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत"

२३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी सात नंतर म्हणजे निर्धारित दिवसाच्या एक दिवस आधीच फाशी देण्यासाठी जेव्हा या तीन वीरांना फाशीच्या तख्त्याकडे नेण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या दंडाधिकाऱ्याला उद्देशून सरदार भगतसिंग म्हणाले " तुम्ही भाग्यवान आहात. हिंदुस्थानी क्रांतिकारक आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी मृत्युला आनंदाने कसे कवटाळतात हे आज प्रत्यक्ष पाहायचे भाग्य आपल्याला लाभले आहे"

संध्याकाळी सात वाजुन तेहेतीस मिनिटांनी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव इन्किलाब झिंदाबादच्या घोष्णा देत फासावर गेले.

आज सत्त्याहत्तराव्या हौतात्म्यदिनी त्यांना सादर वंदन.

संसदेत फेकलेल्या बाँबच्या खोळी

bomb

हुतात्मा भगतसिंग यांचे हस्ताक्षर व स्वाक्षरी

bsinghhsign