सर्वांनाच हे सत्य असतं माहित,शिकणं आयुष्यात पहिलं गृहित
अनुभवाच्या पुस्तकातून शिकत, लिहून घ्यायचं कोर्या वहीत
इथे टिकणं म्हणजे शिकणं आलं, नवशिक्याचं दुखणं आलं
सुरुवातीचं चुकणं आलं ,अपमान गिळून वाकणं आलं
नवागताचं थरथरणं आलं,जाणत्याची बोलणी खाणं आलं
आपल्याच नजरेतून उतरणं आलं,गुरुचं मन राखणं आलं..
आपण सगळेच ह्यातून जातो,कसोटीचा तो काळ विसरतो,
हळूहळू नवीन नवख्याला, आपल्याही नकळत ऐकवू लागतो-
"आम्हाला हवाय माणूस अनुभवी,नवशिक्याची कटकट कुणी घ्यावी?
अहो,उमेदवारी अवश्य करावी पण..गैरसोय कुणी सहन करावी ? "
आजवर असा एकच झाला,आईच्या पोटात शिकून आला
चक्रव्यूहात शिरुन उरलेला,धडा शिकून निघून जायला...
बाकी तुम्हां-आम्हांला, इथे येऊनच शिकायचं-शिकवायचं
आपलं शिकणंही सहन केलं होतं कुणीतरी ,कधीतरी--
.....हे मात्र ध्यानात ठेवायचं !