स्वत्त्वाला तुझ्या कधी
नाही फुटले धुमारे
जसे कासव चोरते
अंग आपुलेच सारे
सिद्धीने तुझ्या कधी
नाही फेकली मुर्वत
ओंजळीत सारे काही
तरी विनयीच हात
तुझ्या कस्तुरीला कधी
नाही आला उग्र दर्प
एका समईत तेवे
स्नेहस्निग्ध संथ दीप
तुझे अनंताचे फूल
चोरी आपुला सुगंध
घ्यावा असोशीने तेव्हा
भूल पाडीतसे धुंद!