राम जन्मला ग सखी .....

उद्या रामनवमी आहे. देशभरात आणि आता परदेशातही जिथे भारतीय लोक असतील तिथे रामजन्माचा उत्सव साजरा केला जाईल. आता सुंठवडा वगैरे वाटायची पध्दत राहिली नसली तरी पेढे वाटून आनंद व्यक्त होईल. त्या निमित्याने थोडा रामनामाचा जप केला जाईल, रामरक्षेचे पठण होईल, कोणाला येत असेल तर रामाची आरती गायली जाईल. रामाची गाणी तर ऐकायला नक्की मिळतील. टीव्हीवर त्याची क्षणचित्रे आपल्याला दिसतील. 

प्रभू रामचंद्राचा विलक्षण प्रभाव आपल्या नकळत आपल्या जीवनावर पडलेला असतो. श्रीराम, रामचंद्र, रघुनाथ, राघव, सीताराम, राजाराम, जयराम यासारखी त्याची अनेक नांवे आपल्या ओळखीची असतात. त्या नांवाच्या विभूती इतिहासात होऊन गेल्या, गेल्या शेदोनशे वर्षात ज्यांनी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आणि अजून करताहेत त्या प्रसिध्द व्यक्तींमध्ये हे नांव दिसते, यातील प्रत्येक नांवाची निदान एक तरी व्यक्ती माझ्या व्यक्तिगत परिचयाची आहे, तशीच सगळ्यांच्याच ओळखीची असेल. माझ्या आधीच्या पिढीपासून माझ्या नंतरच्या पिढीपर्यंत सगळीकडे मला हे नांव पहायला मिळते. रामाप्रमाणेच आपल्या मुलाने ही पराक्रमी, सत्यवचनी आणि आदर्शवादी व्हावे अशी इच्छा त्याचे नांव ठेवतांना आईवडिलांची असेल. त्यालाही रामाप्रमाणे वनवास मिळावा असे मुळीसुध्दा वाटले नसेल. पण दुर्दैवाने वाईट दिवस आलेच तर "प्रभू रामालासुध्दा वनवास भोगावा लागलाच ना? " असे म्हणून त्याच्या चटक्यांचा दाह थोडा सौम्य होतो.

साहित्यामध्ये आणि विशेषतः काव्यामध्ये रामाची गोष्ट कधीच जुनी झाली नाही.  तिच्या अनेक पैलूंचे प्रत्यक्ष दर्शन तर घडतेच, शिवाय वेगवेगळ्या संदर्भात त्यातील घटनांचा उल्लेख येतो, त्या प्रसंगी त्यातली पात्रे कशी वागली याची उदाहरणे दिली जातात. भजन, भक्तीगीत आदी सुगम संगीताच्या प्रकारात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना उद्देशून किंवा त्यांचे गुणगान करणाऱ्या अनंत रचना आहेत आणि नव्या नव्या रचना होत असतात.

रेडिओ आणि टेलीव्हिजन या दोन्ही आधुनिक काळातल्या प्रसारमाध्यमांवर काही काळापुरते 'राम'राज्य निर्माण झाले होते.  जेंव्हा आकाशवाणीवर गीतरामायणाचे साप्ताहिक प्रक्षेपण सुरू झाले तेंव्हा या एका कार्यक्रमाने मराठी जगतात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. बाकीची सारी कामे बाजूला सारून किंवा आधी आटपून घेऊन या कार्यक्रमाची वेळ झाली की घरातली सगळी माणसे रेडिओच्या भोवती गोळा होऊन बसत आणि कानात प्राण ऐकून ती गाणी ऐकत असत. इतकी अफाट लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याही गीतमालिकेला मिळाल्याचे उदाहरण मला माहीत नाही.

रामानंद सागर यांनी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी रामायण दाखवायला सुरुवात केल्यानंतर देशभर हेच चित्र निर्माण झाले होते. कांही झाले तरी रामायणाची वेळ साधायचीच अशा निर्धाराने बाकीची कामे संपवली किंवा टाळली जात. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरातल्या गर्दीच्या रस्त्यांवर रामायणाच्या प्रक्षेपणाच्या वेळेत कर्फ्यू असल्यासारखा शुकशुकाट दिसायचा. त्या काळातल्या दोन मजेदार घटना मला आठवतात.

एका मरहूम खॉंसाहेबांच्या नांवाने चाललेल्या संगीत महोत्सवाच्या शेवटच्या पर्वात दुसऱ्या एका तत्कालीन प्रसिध्द खॉंसाहेबांच्या शास्त्रीय  गायनाचा कार्यक्रम ठेवला होता.  आज रामायण बुडणार या विचाराने श्रोतेमंडळी हळहळत होती आणि चुळबुळ करत होती. पण कार्यक्रमाची वेळ होऊन गेली तरी मुख्य गायकाचाच पत्ता नव्हता. ट्रॅफिक जॅमचा प्रश्नही नव्हता. अखेर रामायणाची वेळ संपल्यावर पांच मिनिटात खॉंसाहेब आले. त्यांनी विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करून उपस्थित श्रोत्यांची माफी मागितली. अखेरीस " मी इथपर्यंत वेळेपूर्वीच येऊन पोचलो होतो, पण वेळ काढण्यासाठी जवळ राहणाऱ्या मित्राच्या घरी बसलो होतो. त्यानंतर रामायण बुडवून मी इकडे कसा येऊ शकणार?" असे उद्गार काढले. आपल्या गायनातून त्यांनी सगळी कसर भरून काढली हे सांगायला नकोच.

दुसरा प्रसंग माझ्या नात्यातल्या एका लग्नाचा आहे.  सकाळचा नाश्ता आणि मुहूर्ताच्या अक्षता टाकून झाल्यानंतर जेवणाला वेळ होता. जवळ राहणारी स्थानिक मंडळी आपापल्या घरी जाऊन रामायण पाहू शकत होती. बाहेरगांवाहून आलेल्या पाहुण्यांनी काय करायचे? वरपक्षानेही त्यात इंटरेस्ट दाखवल्यामुळे धावपळ करून एक टीव्हीचा मोठा संच कार्यालयात आणला गेला आणि कसा ते कुणास ठाऊक, त्याला तात्पुरता एंटेना जोडून रामायणाचे सार्वजनिक पाहणे सुरू झाले. थोड्या वेळानंतर कोणाच्या तरी असे लक्षात आले की सगळी स्वयंपाकी मंडळीसुध्दा त्यासाठी हॉलमध्ये येऊन बसली आहेत. त्यांना बाहेर पिटाळणे सुरू झाले. पण इतर प्रेक्षकांनीच त्यांची बाजू घेत "आम्हाला जेवणाला उशीर झाला तरी चालेल. त्यांना रामायण पाहू द्या. " असे सांगितले. त्यांनी नाराज होऊन स्वयंपाक बिघडवू नये अशा विचाराने त्यांना रामायण पाहू दिलेही गेले. 

गीतरामायणाला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी त्यातली कांही गाणी निरनिराळ्या कार्यक्रमातून अजून ऐकू येतात आणि मुख्य म्हणजे नव्या पिढीतल्या मुलांनासुध्दा ती गावीशी व ऐकावीशी वाटतात. उघड्या मैदानात नाचगाण्याचे कार्यक्रम होणे आता सामान्य झाले आहे, पण जेंव्हा गीतरामायणाला पंचवीस वर्षे झाली तेंव्हा तेंव्हा तसे नव्हते. तरीसुध्दा स्व.सुधीर फडके यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विस्तृत पटांगणात हा रौप्यमहोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. बाबूजींचे गायन ऐकायला दूरदूरहून आलेल्या श्रोत्यांनी ते पटांगण रोज तुडुंब भरत होते. त्यांचे दिव्य गायन प्रत्यक्ष ऐकण्याचे आणि एवढा मोठा जनसागर पाहण्याचे भाग्य मला लाभले.