सेलिब्रेशन

लेटस सेलिब्रेट यार...लेटस सेलिब्रेट

आज बऱ्याच दिवसांनी भेटलोय आपण,

आळवलेल्या तानेनंतर,बऱ्याच वेळानं येणाऱ्या समेसारखे!

आत सुरू झालंय गाणं

अन त्याचा ऱ्हिदम बोलण्यात आलाय...

लेटस सेलिब्रेट यार!!

खरंच काय लागतं रे सेलिब्रेशनला?

-- एक बाटली,दोन ग्लास,दोन जणं,आणि.....

.......एक कारण!!

कारण दोघांचंही एकच हवं का??

नसलं तरी चालतं.

फक्त असावं लागतं एकसारखं मन,

दुःख वाटून घेणारं....आणि....

जाऊ दे.....

लेटस सेलिब्रेट यार..

सुख-दुःखं कशासाठी बोलायची??

---सुख म्हणजे फसफसणारा फेसच..

फेस असतो ना,न दिसणाऱ्या हवेनं तयार होणारा..

तसंच सुखाचं

न दिसणाऱ्या यशानं मिळणारं,

अन न मिळणाऱ्या समाधानानं दिसणारं...

पण फेस जसा लगेच जातो विरून हवेत

तसंच सुखाचं असतं का रे??

निदान आज तरी याचं उत्तर देशील मित्रा?

__तू भेटलास ना कि सुखाची आठवण होते,

तुझ्या येण्यासारखीच,बऱ्याच दिवसांनी

म्हणूनच आजही

लेटस सेलिब्रेट यार!

पण दुःखा...आज मात्र तुझं दुःख मला हवंय

लोकांकडून होणाऱ्या तिरस्काराचं,

किंवा त्यातल्याच काहींकडून विनाकारण जपलं जाण्याचं.

तेवढं देशील?....देच!

हट्टच आहे समज मित्राचा,अन देच तुझं दुःख

देच तुझं दुःख ,अन सुखानं हास!

चिअर्स!! पुसून टाक टिअर्स !!

लेटस सेलिब्रेट यार!!!