ह्यासोबत
( सहज विरंगुळा म्हणून हे लिहिले आहे. कुणालाही दुखावण्याचा यात हेतू नाही. ज्या जाहिरातींवर हे आधारित आहे त्या मुळ जाहिराती आठवल्यास हे वाचतांना मजा येईल )
मणी क्रमांक एकः
चोरी करण्यासाठी एक चोर एका घरात घुसतो.
त्याच्या गळ्यात 'खिचखिच' व्हायला लागते. घरातील आजीला जाग येते. ती म्हणते," बेटा, चोरी करायला आला आहेस ना. घाबरू नकोस. हे घे आधी. हे 'गरारा' सायरप आहे. ते पी, खिचखिच दूर कर, आणि मग शांततेने चोरी कर."
चोर गरारा सायरप गटागटा पितो. आणि बेशुद्ध पडतो. आजी पोलिसांना फोन करून चोराला पकडून देते.
(बघितलंत! आमच्या कंपनीचे गरारा सायरप! चोरांना पकडण्याचा नामी उपाय! आजच घ्या...)
मणी क्रमांक दोन:
प्रतिनिधी : आपण कोणती साडी खरेदी केली?
महिला : 'सुपर' साडी !
प्रतिनिधी : का?
महिला : फुकटात मिळाली म्हणून!
एक अभिनेता : अरे! ही साडी तर माझी पत्नी पण नेसते.
प्रतिनिधी : समजूतदार आहे ना ती म्हणून !
अभिनेता : हे! चुप! खबरदार, पुन्हा असे म्हणालास तर!
मणी क्रमांक तीन:
प्रतिनिधी : ( आम्ही माफी मागतो की आम्ही सौ. सुनीता यांची मुलाखत त्यांना न विचारता शूट केली ) आपण कोणती टिकीया वापरता?
महिला : कोणत्याच टिकिया वर मला विश्वास नाही. तुमच्या कंपनीच्या तर मुळीच नाही.
प्रतिनिधी : का बरे?
महिला : अहो, चांगल्या पांढऱ्या कपड्यावर डाग पडतात... आहे तेच डाग जात नाहीत आणि धुतल्यावर अजून डाग पडतात!"
प्रतिनिधी : समजा , मी ही टिकीया तुम्हाला फुकटात देवू केली, तर?
महिला : नको! मुळीच घेणार नाही.
प्रतिनिधी : ( दर्शकांना ) बघितलंत ! फुकटात सुद्धा घ्यायला कुणी तयार नाही आमची टिकिया! तुम्ही तरी घ्या हो आणि आमची लाज राखा!
मणी क्रमांक चार :
"काय झालं?"
"बाळ रडत होतं."
" ऐकत नसेल तर थोबाडीत दे त्याला. तू लहान असतांना मीही तुला तेच देत होते."