माझ्या जाहिरात एजंसी मध्ये आजकाल गर्दी वाढली होती. हाताखालचे लोकं सुद्धा वाढले होते. दररोज नवनवीन क्लाएंटस त्यांच्या उत्पादनाच्या जाहीराती साठी येत होते. असेच एक दिवस दोन जणं माझ्या केबीन मध्ये आले.
"नमस्कार!!! मी बागुल आणि हे बुवा" बागुल म्हणाले.
"अच्छा! बोला काय काम आहे?"
"तुम्ही तुमच्या एजंसीमार्फत प्रसिद्धी करतात का?"
"हो! आम्ही प्रसिद्धी आणि जाहिरात, दोन्ही करतो. बोला, आपलं काय काम आहे?" मी विचारलं.
"असं बघा!.." बागुल शब्द जुळवत म्हणाले, "आम्ही सामान्य माणसे!! आयुष्यभर मेहनत करून बऱ्यापैकी पैसा कमवला, पत कमविली. पण प्रसिद्धी काही मिळाली नाही. म्हणून आम्ही तुमच्या कडे आलो."
"म्हणजे?? प्रसिद्धी हवी म्हणजे काय?"
"आता बघा, आम्हाला गल्लीतलं कुत्र सुद्धा ओळखत नाही. पोस्टमनला सुद्धा आमचा पत्ता शोधायला नाकीनऊ येतात."
"हो, पण मी त्यात काय तुमची मदत करणार? कुत्र्याला पोळी घालत जा म्हणजे तो शेपुट हलवेल, दारावर पाटी लावा म्हणजे पोस्टमन न चुकता येईल!!" मी म्हणालो.
"अहो तुम्हाला आमचा प्रोब्लेम नाही समजला!! रस्त्याने जातांना लोकांनी नमस्कार करावेत, शहरभर नाव असावं असं वाटत...थोडक्यात काय की शहरातल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये आमच नाव असावं."
"अच्छा! तुमची अडचण समजली. पण आम्ही कंपन्यांची आणि त्यांच्या उत्पादनांची प्रसिद्धी करतो. माणसांची म्हणजे यक्तींची कधी केली नाही."
"ह्यह्याह्या !!! मग आता कराना!! आम्ही ही संधी तुम्हाला देतो" इति मिस्टर बुवा.
बागुलबुवांना प्रसिद्धीचं भुत चांगलच जोऱ्यात चावलेले होते. त्यांनी प्रसिद्धीचा येव्हढा बागुलबुवा का करावा ते समजत नव्हतं. मी त्यांना तसं विचारलं.
"ह्येह्येह्येह्ये!! आम्ही भरपुर पैसा कमवला हो. पण शहरात आमचं नाव काही प्रसिद्ध नाही. आमचे स्पर्धक मात्र त्या बाबतीत आमच्या पुढे गेले." बुवा म्हणाले. बहुतेक ते वाक्याची सुरुवात नेहमी हसण्याने करत असावेत!
"तुम्ही आम्हाला प्रसिद्ध व्हायचे उपाय सांगा. पैसे लागले तरी हरकत नाही." बागुलनीं मात्र आता एकदम मुद्द्याची गोष्ट केली.
"ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला उपाय." मी म्हणालो.
"ह्येह्येह्येह्येह्येह्ये!!!!" बुवांनी हसून आनंद व्यक्त केला.
"मला सांगा, तुमच्याकडे काय विषेश गुण आहेत?"
"हीहीहही!!!विषेश गुण!!हीहीहही!!! अहो, ते असते तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? हीहीहही!हीहीहही!" बुवांच हसणं एकदम मजेशीर होतं.
"अहो मग आम्ही काय म्हणून तुमची प्रसिद्धी करणार?"
"हीहीहही!हीहीहही!!! ते तुम्हीच शोधा!"
आता ५ मिनिटापुर्वी भेटलेल्या माणसांत काय विशेष गुण शोधणार?
"मला सांगा, तुम्हाला शेअर बाजाराची माहीती आहे का?" बागुलनी विचारलं.
"हो, आहे की! शेअर्स, म्युच्युअल फंडस, सगळं माहीत आहे!"
"मग तुम्हाला आमच्यासाठी एखादा शेअर घोटाळा करता येइल का?"
"शेअर घोटाळा ???? तो कशासाठी?"
"बघा, शेअर घोटाळा केला की तो उघडकीस येणार. मग आम्ही प्रसिद्ध नाही का होणार???"
जाहीरात एजंसीतून मी शेअर घोटाळा करावा अशी मागणी करणारा क्लाएंट म्हणजे एक विचित्र प्रकार होता. ग्राहक देवो भव!! काय करणार.
"अहो उघडकीस आला की तुरूंगात पण जाल की!! आणि आजकाल नियम फार बदलले आहेत!! हल्ली शेअर घोटाळा वगैरे काही नाही करता येत!" मी सांगितलं.
"ह्येह्येह्येह्येह्ये!! बागुल, नाहीतरी घोटाळा करणं तुमच्या प्रकृतीला सहन होणारं नाहीये. आठवत का? मागच्या दिवाळीला तुम्ही घोटाळा केला आणि सेक्रेटरी रीटासाठी घेतलेला मिनी स्कर्ट बायकोला आणि बायकोची साडी रीटाला पाठवली होती आणि दोन्हीबाजूंची बोलणी खाल्ली होती... हाऽऽऽहाऽऽऽहाऽऽऽहाऽऽऽहाऽऽऽ" बागलांची अशी 'प्रसिद्धी' करून बुवा एकदम गडगडाटी हसले. त्यांचे हास्य केबिनच्याही बाहेर गेलं. स्टाफ प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे बघत होता. मला बुवांचं वाक्य आणि हसणं दोघांमुळे हसू येत होतं. पण समोरच बागुल बसलेले असल्याने हसता येत नव्हतं आणि हसू पण आवरत नव्हतं. बागुल मात्र अस्वस्थ झाले.
"बरं .. बरं .." म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.
मी आणि बुवा अजुनही खुसखुसत होतो. काय झालं ते बघायला आतमध्ये माझी सेक्रेटरी काहीतरी निमित्त काढून आली.
"सर!!! माकडछाप दंत मंजनासाठी मॉडेल मिळत नाहीये!! शुटींग पुढे ढकलावं लागेल!!"
"हम्म! मी बघतो, आणि सांगतो!!" मी तिला म्हणालो. ती पण हसत हसत निघून गेली.
"मॉडेल लोकांना चांगलीच प्रसिद्धी मिळते ना हो??" बागुलांनी विचारलं.
"हो, अर्थातच! जॉन, बिपाशा, अर्जुन रामपाल हे लोकं सगळे मॉडेलींग मुळेच तर पुढे आले!!"
"ही...ही...ही..काय विचार आहे बागुल!! आपण मॉडेलींग करायचं का? मस्त आयडीया आहे!!! खीखीखीखीखीखी!!!!"
"नको बुवा!! उद्या तुम्ही धोतर नेसून रँपवर गेलात आणि 'वॉर्ड्ररोब मालफंक्शन' झालं तर??????" बागुलांनी षटकार ठोकला. आता ह्या प्रसंगाच काल्पनिक चित्र डोळ्यांपुढे आलं आणि माझं हसून हसून पोटच दुखायला लागलं. स्वतः बुवा हसण्यात सामील झाले. त्यांच्या गडगडाटी हसण्याने परत एकदा ऑफिस दणाणून गेलं.
अचानक माझ्या मनात एक विचार चमकून गेला. मी माझ्या सेक्रेटरीला आत बोलावलं.
"आपल्याला माकडछाप दंतमंजनासाठी मॉडेल पाहीजे ना??? हे बघ हे आहेत आपले मॉडेल..!!!" मी बागुल-बुवांकडे बोट दाखवलं.
तिघे पण माझ्याकडे बघत राहीले. मी समजवायला लागलो.
"हे बघा माझ्या डोक्यात एक थीम येते आहे. बुवांचे एक सरळ असलेले दात आणि हास्य ह्या जाहीरातीसाठी मला एकदम योग्य वाटतं."
माझं वाक्य संपलं आणि बागुल-बुवा त्यांच्या नेहमीच्या स्टाइलने गडगडाटी हसायला लाग्ले. आम्ही दोघेही त्यांच्याकडे बघत राहीलो.
"काय झालं?? कल्पना नाही आवडली का??" मी विचारलं.
"ही ही ही.ऽ.ऽहा..ऽ...हाऽहा..ऽ...हा.ऽ..हाऽ...हा.ऽ..हा.. कल्पना झकास आहे!!!" बुवा म्हणाले.
"पण.. बुवा तुम्हीच काय ते सांगा!!" बागुलांनी बुवांकडे चेडू दिला.
बुवा हसतच होते. हसता हसता त्यांनी बोटं तोंडात टाकली आणि बाहेर काढली. त्यांच्या हातात दातांची कवळी होती. एका हातात ती कवळी तोंडाच्या बोळक्याने विचित्र आवाजात ते हसणं, हा सगळा प्रकार बघून आम्ही सगळेच हसायला लागलो. त्यांच्या दातांचं रहस्य आता माझ्या ध्यानात आलं.
यथावकाश आम्ही जाहिरात शुट केली. बागुल-बुवांनी मलाच उलट मॉडेल बनन्यासाठी पैसे दिले. त्यांना मस्त प्रसिद्धी मिळत होती. त्यात ते खुष होते. मी सुद्धा दोन्ही पार्टींकडून पैसा मिळाल्याने खुष होतो. एकंदर माकडछाप दंतमंजनाचा बागुलबुवा मला चांगलाच फायद्यात पडला!!!!
**********************************************************
(समाप्त)
हेमु.