भास

हा भास म्हणु की आहे तुझेच गाव
बघ श्वास ही माझे घेती तुझेच नाव
भिरभिरतो, झुलतो एक सावळा मेघ
मृगजळ खुणावी होवुनी क्षितीजी रेघ
वादळात हलते झुम्बर दाही दिशांचे
ये पाउस झिरपत होवुनी आर्त मनाचे
आभास असे की जीव खुळावुन जाई
मन बासरी होवुनी तुझीच गीते गाई
वार्‍यावर अवचित उठे धुळीचा लोट
अन हरवुन जाई तुझ्या गावची वाट