एका फुलाचे मनोगत (गजल)

कधी तरी मी फुललो होतो, अता जरी मी सुकलो आहे
कधी तरी दरवळलो होतो, अता जरी उन्मळलो आहे...

मोहवणारा वारा आला तेव्हा माझी कळीच खुलली
मोहरून मी जीव उधळला; मलूल आता उरलो आहे...

मला न होते कुणी माळले, फूलपाखरानेहि टाळले
मी रडलो पण लोक म्हणाले, दवामधे मी भिजलो आहे...

रंग फिकटला, रूप बदलले, गंधहीन मी आता उरलो
अंगच माझे दुमडुन आता पुस्तकात मी दडलो आहे...

वसंत आला माझ्या नशिबी तोही केवळ काहि क्षणांचा
अजून त्या मी आठवणींच्यामधेच का पण रमलो आहे?...