स्वप्न

का कुणांस ठाऊक? काल पुन्हा एकदा,

तू स्वप्नात डोकावलीस, आणि

कधीही न दिल्या घेतल्या वचनांची

आठवण करून गेलीस.

हि स्वप्नं अशीच का असतात?

मनाला चटका लावतात, आणि

परक्यासारखं झिडकारतात.

पण तुझे डोळे वाचले मी.

त्यात खोलवर रुतून बसलेला

तो अर्थ, कधी कळेल की नाही,

कुणास ठाऊक?... पण,

तू निघताना, गुपचुप पदराखाली,

एक क्षण, एक अश्रू,

तुझ्या डोळ्यांच्या कडांवरून ओघळला,

मातीमोल झाला.

त्या एका क्षणाचा, त्या क्षणातल्या अश्रूचा,

त्या अश्रूतल्या नात्याचा,

एका क्षणासाठी का होईना,

मी धनी झालो.

ते नातं सार्थकी लागलं.

ते स्वप्नं.. एवढंच मला कळलं.

--कल्याणयोगी