गूपचुप-गूपचुप नियमात बदल!

दिनांक २७ एप्रिल २००८ च्या लोकसत्ता या वर्तमान पत्रात 'अरुण फडके' यांकडून लिखित, '२०१० पासून शुद्धलेखनाचे सोपे नियम?' या नावाने एक लेख प्रसिद्धीस आला.  ह्या लेखात -पुण्यात फेब्रुवारीमध्ये (परिषद झाली फेब्रुवारीमध्ये, लेख प्रसिद्ध झाला एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात) 'मराठीच्या प्रमाण भाषेचे शुद्धलेखन: एक नवविचार' या विषयावर राष्ट्रीय(?) चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चेला उपस्थिती असलेल्या व्यक्तींनी आपआपसातच ठरवून 'नवे नियम' तयार करून महाराष्ट्र शासनाची मंजुरी घ्येण्याचा घाट घातला आहे. हा लेख त्या विषयावरील आहे.

प्रथम मी पुण्यातील तथाकथित विद्वान मंडळीच्या या आगाऊपणाचा निषेध करतो. अमेरिकेतील मंडळींना अमेरिका म्हणजेच 'सर्व जग' वाटतं तसेच पुण्यातील मंडळींना देखील पुणं म्हणजेच 'अख्खा महाराष्ट्र' वाटतो का? महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांना स्वतःची विविध वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे,  पण ते सर्व पुण्याच्या लोकांच्या बोलण्या, विचार करण्याच्या पद्धतीचा शिक्षणाच्या माध्यमातून अधिकॄतपणे प्रसार झाल्याने पुसले जात आहे. स्वातंत्र काळापूर्वीपासून भाषेचे व्याकरण पुण्याच्या बोलण्याच्या पद्धतींनुसार  स्वीकारले गेले व तेच अजूनही कायम आहे. त्याचे काही परिणाम चांगले झाले असले तरी भाषेवरील पुण्याच्या वर्चस्वामुळे पुण्याच्या 'तुसडेपणा'  महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित समाजात नकळतपणे शिरला आहे.

'मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीचे नवे नियम घालणार्‍या त्या मोजक्याच मंडळींनी फक्त काही 'र्‍हस्व शब्द' दीर्घ लिहिण्याची, तर काही 'दीर्घ शब्द' 'र्‍हस्व' लिहिण्याची गरज का वाटते ते लेखात मांडले गेलेले नाही. तसा बदल केल्याने असाकाय मोठा फरक पडणार आहे? जी मोजकीच मंडळी हे नवीन नियम कायद्याच्या आधारे आणू पहात आहेत त्यांनी -आधुनिक तंत्रानुसार लिपीत सुधारणा करायला हवी, जेणेकरून संगणकावर मराठीचा वापर वाढण्यावर भर देणे शक्य होईल. हा मुद्दा विचारात घेतला होता का? शब्दांमधला वा वाक्यांमधला 'सामायिक शब्दप्रकार' यांसाठी नवीन व्याकरणचिन्हं व त्यांचे वापरण्याचे नियम अस्तित्वास येण्याची गरज वाटली नाही का? 

या उलट, लेखात 'शुद्धलेखनाने' मराठी भाषा 'ज्ञानभाषा होणार' हे असं विचार मांडणं नेमकं काय बरं दर्शविते?

चारपाच टाळकी एकत्र येवून आपआपसातच ठरवून 'नवे नियम' तयार करून महाराष्ट्र शासनाची मंजुरी घेवून सर्व समाजावर अनेक पिढ्यांसाठी बदल लादण्याचा पायंडा पाडणं नक्कीच धोक्याचं आहे. पुण्यातील त्या मंडळींनी असा आगावूपणा करण्या आधी, भाषेसंदर्भात यापुढे कुठलाही 'बदल करताना'  वा 'बदल अधिकॄतपणे करण्याचा' विचार करण्यापूर्वी खालील मुद्दे ध्यानात घ्यावेत.-

१. जास्तीत जास्त लोकांना बदलाविषयी माहिती देणं व माहिती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी इंटरनेट, वर्तमानपत्र, रेडिओ यांचा उपयोग होण्यास हवा. सामान्यांच्याही सुचना मोलाच्या ठरवू शकतात.

२. विविध तंत्रज्ञ विशेषकरून 'संगणका' विषयीच्या तज्ञांची मते ही विचारात घेणे आवश्यक आहे. कारण सध्याच्या विविध माध्यमांचा उपयोगातूनच भाषेचा वापर व प्रसार व्यवस्थित होणं शक्य आहे.

३. मराठी भाषेवर महाराष्ट्रातील सर्व समाजातील सर्व स्थरातील सर्व गावांतील लोकांचा हक्क आहे. कोंकणापासून, विदर्भ- मराठवाडापर्यंत इत्यादींचे अनेक शब्द, म्हणी, वाक्प्रचार मराठी भाषेच्या 'शब्दकोशात' सामावण्यास हवेत.

४. संस्कूतमध्येच का अडकून पडतात? संस्कूत ही प्राचीन भाषा आहे. ती ज्यांना आवडते त्यांनी ती खाजगीत शिकावी.  सध्याची भाषा 'इंग्रजी' आहे. तिच्यानुसार व्याकरणात बदलाचा विचार का करू नये? हे ही ठरविले जावे.