मी अशी नि:स्तब्ध उभी,
एकेक पान गळताना,
हिरवी पाने पाचोळा होऊन,
वाऱ्यासंगे भिरभिरताना..
पानांचा हिरवा पानोरा,
स्मृतिपुष्पांचा नवलफुलोरा,
रसभरल्या टपोर फळांचा,
सडा अनावर ओघळताना..
बालपणीची अल्लड नाती,
तारुण्यातील अवखळ प्रीती,
आजवर जोपासलेल्या हिरवाईची,
एकेक नाळ तुटताना..
भावबंध अन् नाती सरती,
तुटू पाहती रेशिमगाठी,
घट्ट माती परि मुळांभोवती,
सख्या तुझ्याप्रती, येऊ देईना....