दिव्यत्वाची येथ प्रचीती...

ही गोष्ट बॉल्झॅक ( बॉल्झॅक (विकिपिडियावर) ) ह्या फ्रेंच लेखकाची आहे. मी जीएंच्या पत्रांत वाचली होती.

एकदा समुद्रातून एक जहाज चाललेले असते. अचानक वादळ सुरू होऊन ते जहाज एका प्रचंड खडकावर आदळते. जहाज फुटून बुडायला लागते. सर्व लोक घाबरून जाऊन प्रार्थना करायला लागतात. तेवढ्यात एक चमत्कार होतो आणि एक दिव्य तेजस्वी पुरुष तिथे प्रकट होतो. तो सर्वांना त्याच्या मागे यायला सांगतो. सर्व लोक त्याच्या दर्शनाने भारावून जातात आणि त्यांना पाण्यावर चालण्याची शक्ती मिळते. सर्व जण त्या दिव्य पुरुषाचे बोट धरून चालत चालत किनाऱ्यापर्यंत पोचतात. ह्या सर्व प्रकारात जसे कोंबडीच्या पांढऱ्या स्वच्छ पिलांत एखादेच काळे पिलू वेगळे असावे तसा एक जण तिथेच थांबून राहतो... त्या जहाजाचा कप्तान. तो त्या सत्पुरुषाच्या भाषणाने भारावून जात नाही की त्याला पाण्यावर चालण्याची शक्ती मिळत नाही. तो बिचारा आपला दोन लाकडी फळकुटांच्या आधाराने किनाऱ्यापर्यंत पोचतो. तिथे पोचल्यावर तो थकून बसलेला असताना तो भव्य पुरुष हळूच तिथे येऊन त्याच्या खांद्यावर टिचकी मारतो आणि म्हणतो, "हे बघ, आज जसे उपद्व्याप केलेस तसे परत करू नकोस. माणसानं चारचौघांसारखं वागावं. असाच वागत राहिलास तर अजून काही माणसं बिघडतील आणि आमच्यासारख्यांचा अवतारच संपेल. आजची गोष्ट जाऊ दे, पण ह्या पुढे जरा सांभाळून वाग, असा चोंबडेपणा करू नकोस."