एका सुरेल विराणीचे स्वर
अवचित मनात उमटुनि गेले
सुगंधीत त्या आठवणींनी
मनात भलते काहुर झाले
ना प्रिया सखी, ना कुणी सोयरी
आवडली परि तीच लाजरी
तिजहुनि सुंदर रमणी दिसुनी
वाटे मजला तीच गोजिरी
आळवणी त्या करी प्रियेची
ये तू मजला सोबत द्याया
खट्याळ, अवखळ गाली हसुनी
होय म्हणाली माझी व्हाया
दिधली वचने तिला अशी की
तुझ्या प्रीतिचा होतो राजा
दिशा नि विदिशा दरबारी या
ठेविन मी मुजरा घालाया
अंगणात या तिजसाठी मी
फुलवत आहे एक कळी
तिला जणू मोहविण्याचसाठी
मेघ दाटले या गगनी
आकाशी हे जराजरासे
जमू लागता काजळ गहिरे
भिजण्यासाठी तिजला पुसता
नयनी फुलले फूल लाजरे
==============
स्वप्नातुनि मी दचकुनि उठता
वास्तव थोडे चाचपता
फुलाजवळचे काटे सलले
नकार तिचा मिळाला होता
जीवन माझे विदूषकाचे
प्रत्येकाला हासविण्याचे
या वेड्याची साथ कराया
कोणालाही कसे रुचे?
एक विराणी मजपाशी ती
निष्ठेने आली परि जवळी
कायम माझी साथ द्यायचे
लिहिले होते तिच्या कपाळी
सोडुनि गेले सगळे मजला
एकाकी या भयाण ठिकाणी
सोबत माझी करते आहे
एकच गूढ अनाम विराणी