हे प्रभो!
या विश्वात
हा इतका गडद, मिट्ट प्रकाश दाटला आहे की चालतांना भीती वाटते
कारण स्वतःच्याच काय पण इतरांच्या पायाखालचेही
स्पष्ट दिसते आहे!
आणि हा प्रखर-प्रकाशदिन मावळण्याची
काहीच चिन्हे नाहीत तेंव्हा आम्हा प्रकाशग्रस्तांना हवा आहे
एक अंधाराचा कवडसा!
ज्यात तरंगत असतील ओळखीचे
तिमिर, रात्र, चंद्र, चांदणे, इत्यादी नाचरे शब्दकण
आणि ज्याच्या अंधाराने क्षणभर का होईना
दिसेल एखादा अंधारवड, ज्याच्या कृष्णशीतल छायेत
क्षितीजावर काळं फुटेपर्यंत,
ते शब्दकण मुठीत पकडण्याचा खेळही
खेळता येईल आणि न जाणो
तळहातावर रेखल्या जाईल एखादी कृष्णशब्दरंगोली
येणाऱ्या निशेच्या स्वागतासाठी!
....
तेंव्हा हे प्रभो!
आमची सदर मागणी मंजूर व्हावी ही विनंती!
(जयन्ता५२)