हुकूमशहा
.
या आपण सारे मिळोनी एक खेळ खेळूया...
खेळामध्ये असेन मी, तुम्हा सर्वांचा राजा.
मी राजा अन तुम्ही सारे असाल माझी प्रजा,
खेळ खेळूनी दमाल जेव्हा तेव्हा येईल मजा.
या आपण सारे मिळोनी एक खेळ खेळूया...
खेळाचे या आहेत काही, नियम जाणून रहा.
बोल माझे ऐकून सारे, तुम्ही हाँजी हाँजी करा,
नाही तर मी फर्मावेन, तुम्हा काही सजा.
या आपण सारे मिळोनी एक खेळ खेळूया...
खेळखेळता रहा जपूनी, मी आहे तुमचा राजा.
ध्यान लाऊनी उभा सदा मी, जसा बगळोबा,
समजून मज गाफील कुणी, करू नका गमजा.
या आपण सारे मिळोनी एक खेळ खेळूया...
मान झुकवूनी आदेश माझे, तुम्ही गुमान ऐका.
तुमचे जीणे-मरणे आहे, माझ्या हाती आता
पत्तेनगरीतल्या खेळाचा मी आहे हुकूमशहा.
या आपण सारे मिळोनी एक खेळ खेळूया...
या तुम्ही सारे असे, मी खेळवतो तुम्हाला.
=========================
स्वाती फडणीस ........................... १९९९