कांद्याची आमटी

  • दिड वाटी तूर डाळ,
  • दोन मध्यम आकाराचे कांदे,
  • ६-७ लसूण पाकळ्या,
  • २ इंच लांबीचा सुक्या खोबऱ्याचा तुकडा,
  • २ लहान तुकडे दालचीन
  • ३-४ लवंगा,
  • लाल तिखट,
  • काळा (गोडा) मसाला,
  • गुळ
  • चवीपुरती आमसुले अथवा चिंचेचा कोळ,
  • ओले खोबरे,
  • कोथिंबीर,
  • फोडणीचे साहित्य,
  • मीठ,
  • तेल.
३० मिनिटे
२-३ व्यक्तींसाठी

तूरडाळ चवीपुरती हळद व हिंग घालून चांगली शिजवून घ्यावी. एक कांदा बारीक चिरून घ्यावा. वाटणाकरीता एक कांदा आणि सुके खोबरे गॅस वर चांगले भाजून घ्यावे. दालचिनी व लवंगा तळून घ्याव्यात. भाजलेला कांदा, भाजलेलं सुकं खोबरं, लवंग, दालचिनी, ६-७ लसूण पाकळ्या हे सारे वाटून घ्यावे. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात चिरलेला कांदा घालावा. तो गुलाबीसर तळला गेल्यावर त्यात वाटण घालून जरा परतावे. मग त्यात २-३ वाट्या पाणी घालून एक उकळी आणावी. ( पाण्याचे प्रमाण तुम्हाला हव्या असलेल्या दाटपणानुसार कमी-जास्त करावे. ) मग त्यात शिजवलेली डाळ घालून चवीनुसार गुळ, मसाला, लाल तिखट, आमसुले अथवा चिंचेचा कोळ, ओलं खोबरं, मीठ घालून आमटी चांगली उकळावी. वाढताना कोथिंबीर पेरून वाढावी.

तांदळाची भाकरी, ओल्या खोबऱ्याची लसूण घालून केलेली चटणी आणि ही आमटी, मस्त बेत जमतो.

आई