बुद्धाचे दात - १

ख्यातनाम हिंदी साहित्यिक शरद जोशी यांच्या एका कथेचे हे स्वैर भाषांतर आहे.

पेकिंगच्या बाजारात अशी मंदी कधीच आली नव्हती. काय करावे हे दुकानदारांना कळत नव्हते. सगळे साठवलेल्या पुंजीतून खर्च करायला लागले होते. नव्या मालाकरता मागणी येणे जवळपास बंदच झाले होते. याचा परिणाम कारखान्यांवरसुद्धा होऊ लागला होता. त्यांची गोदामे भरलेली होती आणि यंत्रे बंद करायची पाळी आली होती. चिअँग-कै-शेक च्या सरकारला कळत नव्हते की काय करावे. रोजरोज मंत्र्यांच्या बैठकी होत, आणि आर्थिक प्रश्नांवर काय तोडगा काढावा याबद्दल वादविवाद चाले. ते वादविवाद आणि त्यातून निघालेले तोडगे रोज वृत्तपत्रांत छापले जात पण त्याचा काहीही उपयोग होत नसे. लोकांची वृत्तपत्र खरीदण्याची इच्छाच नाहिशी झाली होती. मंदीचे हे वातावरण बराच काळ चालू राहिले. पेकिंगमधील एका वरिष्ट पत्रकार च्याऊ प्याऊ यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर पेकिंगच्या अख्ख्या बाजारानेच जणू अफूचा मोठ्ठा डोस मारला होता. नेहमी गजबजलेला तो बाजार सकाळ-दुपार-संध्याकाळ आता निर्जन असे. मिचमिच्या डोळ्यांचे दुकानदार बाजारात आलेल्या एकट्यादुकट्या माणसाला न्याहाळत बसत आणि सदैव विचारत की त्याला काय घ्यायचे आहे.

जे लहानशा भांडवलावर दुकान चालवीत असत त्या दुकानदारांची खरी अडचण झाली होती. फॅन्सी आयटेमची खरेदी बंदच झाली होती. कपडे, आरसे, फुगे, दागिने किंवा रेशीम यांची खरेदी म्हणजे लोक पाप समजू लागले होते. सिनेमा-नाटकांना दहा टक्केसुद्धा खुर्च्या भरत नसत, आणि सगळा पैसा जाहिरातीवरच खर्च होत असे. गिऱ्हाईकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दुकानदार मंडळी नेहमी काहीतरी नवे करण्याच्या मागे असत. कुणी अर्धावगुंठित सुंदरींच्या मोठमोठ्या तसबिरी टांगून ठेवी, कुणी बाजा वाजवत डुलणारा विदूषक उभा करीत, कुणी सवलत आणि बक्षिसांची खैरात करण्याच्या मागे लागे.

एका धार्मिक पुस्तकाच्या खरेदीवर एका स्त्रीचे उत्तेजक चित्र मोफत मिळे. यामुळे काही पुस्तके विकली जात. तरुण मुले ही पुस्तके खरेदी करत, चित्र आपल्या झोपण्याच्या खोलीत टांगून ठेवत आणि पुस्तक बापाला भेट म्हणून देत.

नृत्यघरांत जाणाऱ्यांना एक भगवान बुद्धाची तसवीर मोफत मिळे. यामुळे नृत्यघरांना काही धार्मिक प्रवृत्तीचे ग्राहक मिळत.

प्रत्येक दुकानदार ज्यायोगे आपले दुकान चर्चेत राहील, आणि आपल्याला ग्राहक मिळेल असे काहीतरी नवीन करायला पाही. दुकानातल्या विक्रेत्या मुलींना दुकानमालक आणि व्यवस्थापक सूचना करीत, की त्यांनी येणाऱ्या जास्तीत जास्त तरुणांना आपल्या प्रेमजालात गुरफटवून ठेवावे, म्हणजे मग ते तरुण त्यांच्याच दुकानात कायम खरेदीला येतील. यासाठी त्या मुलींना जी प्रेमपत्रे पाठवावी लागतील त्यांचा खर्चही ते द्यायला तयार होत. थोडक्यात सांगायचे म्हणजे पेकिंगमधील ही मंदी ऐतिहासिक होती, ज्यामुळे भल्याभल्यांची वाट लागली होती.

एका छोट्याशा गल्लीमध्ये दंतवैद्य ल्यू च्यांग पांग यांचे दात काढण्या/पाडण्याचे दुकान होते, आणि इतर दुकानांप्रमाणेच तेही मंदीची शिकार ठरले होते. एखाद्याचा हालता दात उपटून त्या दाताबरोबर आपले दुकानाचे महिन्याचे द्यावे लागणारे भाडे उपटण्याचा बेत विफल ठरत होता. त्याच्या दुकानासमोर एक न्हाव्याचे दुकान होते, जे अशाच रीतीने गिऱ्हाईकांच्या दुष्काळाचा सामना करीत होते. दिवसभर तो न्हावी आणि ल्यू च्यांग पांग समोरासमोर बसून येणाऱ्याजाणाऱ्याकडे आशेने टुकत बसत. न्हावी मधूनच जाणाऱ्या मुलांना पकडे, त्यांना चावट गाणी आणि विनोद सांगी, आणि त्यांचे केस पकडून हिसडत म्हणे, "कापून घ्या हे, वाढवलेत काय डुकरासारखे?". ल्यू च्यांग पांग स्वतःला प्रतिष्ठित वैद्य समजत असे, त्यामुळे तो असल्या पातळी सोडलेल्या गोष्टी करू शकत नसे. त्याचे दुकान पिढ्यानपिढ्या चालत आलेले होते, आणि ते खानदान वेदनारहित पद्धतीने दात काढण्याबद्दल प्रसिद्ध होते. ल्यू च्यांग पांग गंभीर प्रवृत्तीचा होता आणि थोरामोठ्यासोबत अदबीने बोलत असे. अनेकदा तो कुणा प्रौढ व्यक्तीला आपल्या दुकानात बोलावून आसन देत असे आणि दर्शने, काव्य, चित्रकला आदी गोष्टींवर चर्चा करीत असे. हळूहळू तो ही चर्चा पायोरियावर आणीत असे आणि त्या प्रौढ व्यक्तीला सल्ला देई की दातांकडे नीट लक्ष ठेवा, एखादा कमजोर झाला तर वेळीच (वेदनारहित पद्धतीने) उपटून घ्या. प्रौढ व्यक्ती त्याला तोंडभरून होकार देऊन आपला रस्ता सुधारीत असे. बाजारात मंदी होती आणि कुणाकडे दातावर मारायलाही पैसा नव्हता तर दात उपटून घ्यायला कुठून येणार?

एका सकाळी ल्यू च्यांग पांगने पाहिले की समोरचा न्हावी त्याच्या (न्हाव्याच्या) दुकानासमोर एक फलक टांगतो आहे. फलकावर लिहिले होते, "केस कापून घ्या आणि तेलाची एक बाटली मोफत मिळवा." फलक लावून झाल्यावर न्हावी ल्यू च्यांग पांगकडे पाहून हसला आणि म्हणाला, "दुकान चालवायला लागते तर काही स्टंट करायला लागते नं.... नाहीतर भुके मरून जाऊ नं"

डॉक्टर ल्यू च्यांग पांग दिवसभर बसून त्या फलकाकडे पाहत राहिला, आणि विचार करीत बसला की आपल्या दुकानात जास्तीत जास्त (किंवा किमान, कुणीतरी) दात उपटून घ्यायला येतील अशी काय युक्ती करावी? असा विचार करीत असताना त्याला अचानक शहरातली चहापानगृहे आठवली. तिथे लिहिलेले असे की इथे अमूकतमूक थोर व्यक्ती येऊन चहापान करते/करून गेली. प्रसिद्ध राजकारणी, चित्रकार आणि लेखक यांची नावे तर विशिष्ट चहापानगृहांतील विशिष्ट टेबलांशी जोडली गेली होती. ल्यू च्यांग पांगने विचार केला की त्याच्या दुकानातही अनेक प्रसिद्ध महापुरुषांनी दात उपटून घेतलेत अशी जाहिरात करावी. तो महापुरुषांची यादी करायला बसला आणि सर्वात पहिले नाव आले ते भगवान बुद्ध यांचे. खुद्द बुद्धांनी इथे दात उपटून घेतले होते असे का प्रसारित करू नये? ल्यू च्यांग पांगचा इतिहास फारसा पक्का नव्हता. पण त्याला एवढे पक्के माहीत होते, की भगवान बुद्ध चीनमध्ये नव्हे, तर भारतात जन्मले आणि निवर्तले होते. म्हणजे, प्रचार असा करायला हवा होता की ल्यू च्यांग पांगच्या कुणी पूर्वजाने भारतात जाऊन भगवान बुद्धांचा दात (वेदनारहित पद्धतीने) उपटला होता, आणि लगेच परतपावली चीनला येऊन हे दुकान उघडले होते.

अख्खा आठवडा ल्यू च्यांग पांग ही योजना विणत बसला. त्याने इतिहास आणि धर्मासंबंधी जुने ग्रंथ वाचून काढले, चीनमध्ये बुद्ध धर्माचा प्रसार कसा झाला याबद्दल माहिती गोळा केली आणि त्यात कुठे आपल्या पूर्वजांची नावे घुसवता येतील याचा हिशेब पक्का केला. मग त्याने त्याच्याकडच्या उपटलेल्या दातांच्या डब्या धुंडाळून अत्यंत जुने दिसणारे असे दोन दात वेगळे काढले. हेच ते भगवान बुद्धांचे दात.

दहा दिवसांनी पेकिंगच्या वृत्तपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध झाली. "प्रसिद्ध दंतवैद्य ल्यू च्यांग पांग यांच्या अनुभवी आणि खानदानी हातांनीच आपले दात उपटून घ्या. ल्यू च्यांग पांग यांचे पूर्वज पो च्यांग पांग यांनी कित्येक शतकांपूर्वी भारतात जाऊन खुद्द भगवान बुद्धांचे दोन दात जबड्यावेगळे करून त्यांना दंतवेदनेपासून मुक्त केले होते. आजही ते भगवान बुद्धांचे पवित्र दात ल्यू च्यांग पांग यांच्याकडे सुरक्षित आहेत. त्यांचे दर्शन घेण्यासाठी आणि कमीतकमी पैशांत जास्तीत जास्त दात उपटून घेण्यासाठी अवश्य या"

दुसऱ्या वृत्तपत्रात ल्यू च्यांग पांग यांची दुसरी जाहिरात प्रसिद्ध झाली, ज्यात त्यांचे छायाचित्रही दिले होते. त्यात होते, "दात उपटणे आमच्या खानदानासाठी व्यवसायच नव्हे तर धर्मही आहे. ज्यांच्या पूर्वजांनी कधीकाळी खुद्द भगवान बुद्ध यांच्या दातांना हात घातला होता, त्यांचे हात आज आपले दात उपटायला सज्ज आहेत. ल्यू च्यांग पांग यांचा दंतखाना म्हणजे कमीतकमी पैशांत जास्तीत जास्त दात उपटून घेण्याचे एकमेव स्थान"

या जाहिरातींनी अख्ख्या पेकिंग शहरात गोंधळ माजवला. सगळ्या शहरातून जनसमुदाय मखमलीच्या गादीवर फुलांनी वेष्टिलेले भगवान बुद्धांचे दात पाहण्यासाठी ल्यू च्यांग पांग यांच्या दंतखान्यात लोटला. जनता एवढी धर्मवेडी असेल याची ल्यू च्यांग पांगला कल्पना नसल्याने सुरुवातीला तो हबकला. पण मग त्याने धीरत्व धरून जिज्ञासू लोकांना भगवान बुद्धांच्या दातांची कथा सांगायला सुरुवात केली. अख्खा दिवस गर्दी उसळत राहिली. फुले आणि नगद पैसे त्या दातांवर पडत राहिले. ल्यूचा सगळा दिवस नुसत्या नमस्कार-चमत्कारांमध्येच गेला.

दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत डॉक्टर ल्यू च्यांग पांग आणि भगवान बुद्धांचे दात अशी दोन्ही छायाचित्रे प्रसिद्ध झाली. इतिहासाचे ते सोनेरी पान प्रकाशात आले. पो च्यांग पांग हा दंतवैद्य थेट भारतात जाऊन प्रत्यक्ष भगवान बुद्धांची दंतशूलापासून सुटका करून, आणि प्रसादस्वरूप असे ते दोन दात घेऊन चीनला परत आला. पण चीनची जनता त्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारायच्या मूडमध्ये नव्हती, त्यामुळे त्या दातांचा योग्य तो सन्मान झाला नाही. ते दात पो च्यांग पांग याने एका डब्यात ठेवले आणि ही गोष्ट तो आणि त्याचे वंशज विसरून गेले. पण प्राचीन संस्कृती आणि कुलवृत्तांत यांच्यात पराकोटीचा अभ्यास असलेले ल्यू च्यांग पांग यांनी तळघरातून ते दात शोधून काढले.

नंतरच्या दिवशी लोटणाऱ्या जनसमूहाला आवरण्यासाठी पोलीस आले. दस्तुरखुद्द च्यांग कै शेक आणि त्यांच्या पत्नीने येऊन त्या पवित्र दंतद्वयीचे दर्शन घेतले, आणि आपला एकेक दात ल्यू च्यांग पांग यांच्याकडून उपटून त्यांना सन्मानित केले.

एव्हाना बातमी पेकिंगच्या बाहेर पोचली होती आणि लांबलांब ठिकाणांहून लोक येऊ लागले होते. त्या पवित्र दंतद्वयीपाशी इतकी नाणी जमली, की ल्यू च्यांग पांगला एक पुजारी (नाणी पटापट, आणि बऱ्याचदा दृष्टिक्षेपातच, मोजणारा पुजाऱ्याशिवाय आणखी कोण असणार?)  आणि एक नोकर (पुजारी स्वतः काम करू लागला तर मग त्याचा मान तो काय राहिला?) नेमावा लागला.

दात उपटायचे कामही झपाट्याने वाढले. पेकिंगच्या उच्चभ्रू वर्गात ल्यू च्यांग पांग कडून दात उपटून घेणे ही एक फॅशनच होऊन गेली. क्लबांतून दातांसंबंधी चर्चेला जोर आला. ल्यू च्यांग पांग स्वतः एका फॅशनला वाहिलेल्या मासिकात दातांसंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागला ("तोंड उघडायची चोरी? तोंड दाबून बुक्क्यांचा मार? किती काळ सहन करणार? खुल्या तोंडाने लिहा. प्रश्न तुमचा, उत्तर खुद्द ल्यू च्यांग पांग यांचे")

ल्यू च्यांग पांग ज्यांची एवढी टिमकी वाजवीत होता, ते दात खरोखर बुद्धाचे आहेत की नाही याबद्दल अनेकांना शंका होती. एरवीची परिस्थिती असती, तर "अस्सल म्हणून नक्कल खपवण्याचा अश्लाघ्य आणि गर्हणीय प्रयत्न" अशा मथळ्यांचे लेख वेगवेगळ्या नियतकालिकांत नक्कीच झळकले असते. पण एकंदरीत पेकिंग शहराची आणि एकुणातच चीन देशाची परिस्थिती पाहता दातांसंबंधी शंका उपस्थित करणे हेच सरकारकडून अश्लाघ्य आणि गर्हणीय मानले जाण्याची शक्यता जास्त होती. कारण खरे असोत वा खोटे, त्या दातांमुळे लोकांचे लक्ष आर्थिक संकटापासून जरा दूर गेले होते. शहरात बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे पेकिंग शहरातली मंदी जवळजवळ ओसरल्यातच जमा होती. रिक्शावाल्यांना गिऱ्हाईके मिळू लागली, उतारूगृहे भरू लागली आणि दुकानांतल्या वस्तूंना उठाव मिळाला. एवढे सगळे फायदे असल्याने सरकार अर्थातच्या त्या दातांच्या बाजूने होते. इतकेल्च काय, कम्युनिस्ट पक्षानेसुद्धा आपल्या पॉलिटब्यूरोची एक खास बैठक भरवून ते बुद्धाचे दात असल्याचे जाहीरपणे मान्य केले. अद्यापि त्यांची सत्ता आलेली नसल्याने जनमताविरुद्ध जाण्याचे त्यांचे धाडस होत नव्हते. एक राष्ट्र म्हणून चीनला जे गौरवास्पद असेल ते त्यांनाही हवेहवेसे वाटत होतेच. खुद्द भूमिगत नेता माओ त्से तुंग याने ल्यू च्यांग पांगला एक पत्र पाठवून त्याचे अभिनंदन केले होते.

माओ त्से तुंगने लिहिले होते, "च्यांग कै शेकच्या प्रतिगामी राज्यातही तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी बुद्धाचे दोन दात शोधण्यात यशस्वी झालात हे एक अत्यंत सुखद आश्चर्य आहे. पण कॉम्रेड, मी एवढे जरूर म्हणेन की चीनमध्ये आज जर या रक्तपिपासू आणि भांडवलदारांच्या बगलबच्चांऐवजी कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचे वर्गविरहित साम्यवादी सरकार असते, तर सरकार आणि जनतेच्या सक्रिय मदतीने तुम्ही दोन दातच काय, बुद्धाची अख्खी बत्तीशी शोधून काढली असती. पण विश्वास ठेवा कॉम्रेड, तो दिवस जरूर येईल, आम्ही यशस्वी होऊ." माओने पत्रात पुढे सर्व दंतवैद्यांनी एक संघटना उभारावी, आणि त्या संघटनेने श्रमिक आणि सर्वहारा वर्गाच्या लढ्याला संपूर्ण पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शेवटी श्रमिक आणि सर्वहारा वर्गाचा लढा भांडवलशाहीचे दात तोडण्यासाठीच असल्याने दंतवैद्यांच्या संघटनेने त्या लढ्याला बळ पुरवणे ओघानेच आले.

"निम्न वर्गाला आज स्वतःचेच दात साफ करणे कठीण झाले आहे, कारण भांडवलशाहीच्या हस्तकांनी टूथब्रश आणि टूथपेस्टच्या किंमतीही श्रमिक जनतेच्या व्ययशक्तीच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवल्या आहेत. अशा प्रकारे विज्ञानाच्या सर्व प्रगतीचा लाभ हा पुंजीपती वर्गच उपटतो आहे" असे आपल्या पत्रात या महत्त्वपूर्ण आर्थिक प्रश्नाचे सांगोपांग विवेचन करून माओने आपल्या पत्रात ल्यू च्यांग पांगला लिहिले, "कॉम्रेड, पण एक सांगून ठेवतो. क्रांती यशस्वी होणारच आहे. खिळखिळ्या झालेल्या या प्रतिगाम्यांच्या डोलाऱ्याला बस फक्त एक धक्का अजून द्यायची गरज आहे. एकदा का क्रांती झाली, की चीनमधल्या सगळ्या जनतेचे दात केवळ चमकदार आणि मजबूत नसतील, तर ते जास्त धारदार आणि लांबही असतील. तसेच भांडवलशाही आणि सरंजामशाही युगांपासून चालत आलेली दातांची बत्तीस ही संख्या वाढवून ती चाळीस करण्याचा प्रयत्न करण्यात येईल." पत्राच्या शेवटी माओने ल्यू च्यांग पांगचे पुनश्च अभिनंदन करून बुद्धाचे दोन दात मिळणे हा श्रमिकांच्या लढ्याचाच विजय असल्याचे ठासून प्रतिपादन केले.

ल्यू च्यांग पांगने हे पत्र वाचले आणि तो गंभीर झाला. मग अचानक तो खदाखदा हसू लागला आणि "झिंदाबाद", "चिरायू होवो" असल्या घोषणा किंचाळू लागला.

या सगळ्या प्रकारात ल्यू च्यांग पांगचे दात उपटायचे दुकान अत्यंत तेजीत चालू लागले हे सांगणे नकोच. त्याच्याकडे जाऊन दात उपटून घेणे हे एकदम उच्चभ्रूपणाचे, प्रतिष्ठेचे आणि दुसऱ्याला (दुसरीला) मान खाली घालायला लावणारे लक्षण ठरून गेले ("अय्या, तुम्ही ल्यू च्यांग पांगकडून एकही दात नाही उपटून घेतलात? मीतर बाई परवाच जाऊन चांगले चार उपटून घेतले. दुखत नसले म्हणून काय झालं? नाहीतरी झुरळं खायला दात लागतात कशाला? आमचे हे नको नको करत होते, पण त्यांचे पुढचे दोन उपटायला लावलेच. चांगलेच पिवळे पडले होते अफूने. पण तुम्हांला ल्यू च्यांग पांगची अपॉईंटमेंट मिळाली नाही म्हणजे कम्माल आहे..... मी तर अपॉईंटमेंट वाया जायला नको म्हणून आमच्या मोलकरणीचेही तीन दात उपटून घेतले" इ इ). च्यांग कै शेकचे दोन मंत्री, तीन राजदूत आणि तिबेटहून आलेल्या काही लामांनीसुद्धा ल्यू च्यांग पांगकडून आपले दात उपटून घेतले.

दुकानाच्या अर्ध्या भागात देवळासारखी व्यवस्था होती. तिथे जनलोक त्या पवित्र दातांवर पैसे वाहत. उरलेल्या अर्ध्या भागात दात उपटायचा व्यवसाय चाले, जिथे बाकांवर बसून दंतोत्पाटनोत्सुक व्यक्ती वाट पाहत बसत असत.