हलकीशी सर

हलकीशी सर आली आणि भिजवून गेली
वादळाची गाणी माळरानी रुजवून गेली

निळ्या नभी अकस्मात मेघ सावळे दाटले
मोरपिसाऱ्याचे डोळे आनंदाने लकाकले
काळोखाचे अंतरंग वीज उजळून गेली     हलकीशी सर आली

ओलसर वाऱ्यातून आली लकेर आर्जवी
साऱ्या रानास तजेला फुटे पोपटी पालवी
उल्हसित फुलराणी फुले उधळून गेली     हलकीशी सर आली 

थेंब टपोरे होऊन आठवणी बरसल्या
तुझे भास झाले धुके साऱ्या वाटा हरवल्या
शीळ पाखराची साद नवी सुचवून गेली     हलकीशी सर आली