मिडियाविकिची उपयुक्तता(... आणि भाषांतर)

मिडियाविकी हे वेबपेजवर मजकूर सहज बदलू देणारे सॉफ्टवेअर आहे हे आपण मागच्या लेखात वाचले असेल. सध्या इंग्रजी शब्दांचे मराठीकरण कसे करावे हि चर्चा मध्ये मध्ये रंगत असते पण मिडियाविकिचा फायदा असा की वरचेच पहिले वाक्य मी  "मिडियाविकी हे संकेतस्थळावर कंटेंट सहज बदलू देणारी संगणक प्रणाली  आहे  असेही सहज बदलू शकेन चपखल शब्द मिळे पर्यंत जमेल तसे भाषांतर करून ठेवावे, व ज्याला जसे सुचेल जेव्हा सुचेल त्याप्रमाणे योग्य बदल घडवावा.

मनोगतावरील चर्चा सदरावरचा व इतरही काही सदरांबद्दल माझा रस कमी होत चालला आहे म्हणून मी मिडियाविकी आणि विकिपीडियातील भाषांतरणाचा प्रयत्न करताना आलेला अनुभव येथे स्वतंत्र पणे नोंदवावा असा विचार केला .

भाषांतर करताना सर्व साधारणता भाषांतर केल्यानंतर बऱ्याचदा उरलेले इंग्रजी शब्द जेवताना खडा लागल्यासारखे होतात अशा  शब्दास चपखल मराठी शब्द शोधावा असे मनातन वाटते आणि मग माझी शब्दशोध यात्रा सुरू होते. तसा माझा मराठी भाषा शब्दसंग्रह मोठा नाही आणि मुख्य म्हणजे हवे तेव्हा आठवत नाही असे बरेचदा होते त्यामुळे मी आंतरजालावरील अनेक स्वाभाविक संकेतस्थळांचा वापर करून शक्य तेवढे मराठी पर्याय तयार करण्याचा प्रयत्न करतो. मूळ इंग्रजी शब्द तसाच ठेवण्याचा पर्यायही नाकारत नाही, दुसरा प्रयत्न त्याला एखाद्या ग्रामीण मराठी माणसाने कसा उच्चार केला असता आणि तो कितपत स्विकार्य होईल ते बघतो, त्यानंतर धाव घेतो ती संभाषणम संस्कृत कोशाची त्यातील शब्द वापरले नाहीत तरी पुढील शब्दशोधास त्याची नितांत मदत होते

निवडलेले संस्कृतशब्दांना मुंबई आय आय टीच्या शाब्दबंध मध्ये काही मराठी पर्याय मिळतात काते पाहतो. एवढे करून योग्य मराठी पर्याय न मिळाल्यास गूगल वर डिफाईन असे लिहून संबंधित शब्दाची व्याख्या तसेच इंग्रजी  विक्शनरीत व्युत्पत्ती अभ्यासतो व्युत्पत्ती व व्याख्येच्या साहाय्याने काही अधिक योग्य मराठी शब्द सुचतो का ते बघतो.

सोबतच मोल्सवर्थ समकक्ष वझे शब्दकोशाची आणि नवीन खांडबहाले इंग्रजी मराठी शब्दकोशाची पण मोठी मदत होते, क्वचित भांडारकरांचे शब्दभांडार तर कधी आपटे संस्कृत डिक्शनरी पण वापरतो.   अधून मधून परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे अभ्यासतो.

मराठी आंतरजालावर चर्चा करणारे सल्ले देणारी खूपंमडळी आहेतच त्यांचे सल्ले तुकारामांच्या 'निंदकाचे घर असावे शेजारी' एवढ्या प्रेमाने घ्यावे हे शिकलो बाकी सकारात्मकरीत्या काम करणारी मंडळी खूप चर्चा रंगवत न बसता काम करते ते करावे हे बरे.

अधिक चांगल्या भाषांतर कामा साठी मराठी व्याकरण शक्य तेवढ्या विस्तृत स्वरूपात इंटरनेटवर लौकरात लौकर उपलब्ध व्हावयास हवे . मराठी आणि संस्कृत प्रत्ययांची माहिती पण लौकरात लौकर इंटरनेटवर चढवून हवी आहे. आणि मुख्य म्हणजे मराठी शब्द व्युत्पत्तीची पण गरज भासते  मराठी शब्द व्युत्पत्तीचे पुस्तक मुंबई पुण्यासहित बाजारात शोधून सुद्धा सापडत नाही हि वेगळीच शोकांतिका आहे. व्युत्पत्तींचीसुद्धा पारिभाषिक शब्द तयार करताना मोठी मदत होऊ शकते.

-विकिकर