पर्यटन, पर्यावरण आणि आपण

यंदा पावसाने मुंबईत मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर वेळेवर हजेरी लावली आणि तेही दमदारपणे. पावसाची रिमझिम सुरू होताचे शहरवासियांना वेध लागते ते वर्षा सहलीचे. पावसाचे आणि निसर्गाचे नाते तसे अतुटच. पावसाळ्यात काय करायचे? याची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. बाहेर पाऊस पडत असताना कुणाला घरी जुनी गाणी ऐकत मस्त कांदाभजी फक्कड चहाबरोबर खायला आवडतो, तर कुणाला मित्र मैत्रींणीसोबत धबधब्यात, साचलेल्या पाण्यात स्वच्छंदी धमाल करायला आवडते, तर काहींना सह्याद्रिच्या कुशीत फिरायला. अशा ह्या वर्षाऋतुच्या व ५ जून रोजी झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त हा लेख मनापासून लिहावासा वाटला.

                                निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरू, सखा, बंधू, मायबाप।
                                त्याच्या कुशीत सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप॥

खरे तर संपूर्ण पावसाळाच हा सह्याद्रिच्या ऋतुचक्राचा राजा आहे. पण सध्या काही हौशी पर्यटकांमुळे तो बदनाम होत चालला आहे. काही अति उत्साही पर्यटकांमुळे लोणावळा, खंडाळा, पळसदरी, माळशेज घाट हि निसर्गरम्य ठिकाणे कौटुंबिक सहलीच्या यादितून केव्हाच बाद झाली आहे. असे म्हटले जाते कि, लोणावळा, खंडाळा, पळसदरी, माळशेज घाटात पाऊस आणि दारुडे एकत्रच येतात. गमतीचा भाग सोडला तर आपण सर्वांनी गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे. अशीच जर एक एक निसर्गसौंदर्याने भरलेली ठिकाणे आपण आपल्या करणीने नष्ट करत राहिलो तर आपल्या भावी पिढीला निसर्ग हा केवळ चित्रांमध्येच पाहावा लागेल. निसर्गाने मानवाला अगदी भरभरून दिले आहे पण बदल्यात आपण त्याला काय दिले? प्रत्येक वेळी त्याच्याकडून ओरबाडुनच घेतले आहे.

पण निसर्गाच्याही सहनशीलतेला अंत आहे आणि त्याने त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी, पूर, वादळ, त्सुनामी ह्याद्वारे दिलेले आहेच. प्लॅस्टिकच्या वापराबबती कितीही आरड ओरड चालू असली तरी आजही त्याचा वापर सर्रास केला जात आहे. "मी एकट्याने प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या तर काय होणार आहे? " पण हाच विचार सगळ्यांनी केला तर??? ३ वर्षापूर्वी मुंबईत २६ जुलैला झालेल्या महाप्रलयाला ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्याच जबाबदार आहे हे माहित असुनही आपल्या रोजच्या वापरात त्यांचा उपयोग चालुच ठेवला आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे टाकलेल्या या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे आज कित्येक प्राणी, जलचर सृष्टी  मृत्युमुखी पडत आहे. १९९० साली प्रख्यात जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात काही हरणं अचानक मेली. त्यांच्या मृत्युचे कारण कुणाच्या लक्षात येत नव्हते. शवविच्छेदनानंतर असे लक्षात आले कि, बेजबाबदार पर्यटकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यातून टाकलेले खाद्यपदार्थ त्या निष्पाप प्राण्यांनी प्लॅस्टिकसहित खाल्ले होते. आपण फक्त हि एक बातमी आहे असे समजून दुर्लक्ष करतो.

आज पर्यटन करताना आपल्या आजुबाजुची नैसर्गिक संपत्ती, प्राणीजीवनाल पोहचणारा धोका, निसर्गाची अनमोल दौलत, वनसंपत्तीचा हव्यास, अभयारण्यात येणाऱ्या वाहनांच्या आवाजाने वन्य प्राणीजीवांना होणारा व्यत्यय, वाहनाखाली सापडून मरणारे वन्यजीव यांची काळजी घेतली पाहिजे. पर्यटन म्हणजे पर्यावरणाची हानी नव्हे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. माणसाची हाव दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तो राजरोसपणे झाडांची कत्तल करीत सुटला आहे. एक झाड कापण्यासाठी काही वेळ लागतो पण तेच झाड वाढवण्यासाठी मात्र कित्येक वर्षे हेच त्याला मुळी कळत नाही. जंगलातील प्राण्यांच्या वास्तव्याला माणसाच्या ओरबाडण्याने ते अजाणतेपणाने सिमेंटच्या जंगलात येत आहे.

जमिनीची धूप रोखण्यासाठी खारफुटी (मॅंग्रोव्हज) हि तर निसर्गयोजनाच आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी माणसाने आज त्याचीही राजरोसपणे कत्तल सुरू केली आहे. आज समुद्राच्या लाटा थोपवण्याचे सामर्थ्य ह्या खारफुटीची झाडात आहे. ह्याचे लाकुड लवचिक असल्याने मासेमारीसाठी होड्या, गळ, फर्निचर, जळण म्हणून ह्याचा सर्रास उपयोग होत आहे. आज सागरावर पाय रोवण्याच्या इर्ष्येने माणुस मुंबईची किनारपट्टी खचवतोय. ह्या खारफुटीच्या झाडांना तोडून आणि समुद्रात भर घालून त्याने वस्त्या वसवल्या आहेत. स्वच्छ फेसाळता समुद्र, त्याचा सुंदर किनारा यांचे नैसर्गिक सौंदर्य आपण बिघडवत चाललो आहोत. ह्या समुद्रानेसुद्धा आपल्याला भरभरून दिले आहे/देत आहे. पण आपण मात्र निर्माल्य, कचरा, प्लॅस्टिक, मद्याच्या रिकाम्या बाटल्या टाकून त्याची परतफेड करतोय. हल्ली समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना त्यांच्या जाळ्यात कित्येक टनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडत आहेत. कारखान्याचे रासायनिक सांडपाणी नदी, खाडीमध्ये सोडले जाते. ह्या प्रदुषित पाण्यामुळे सारी नदी किंवा खाडी प्रदुषित होते आणि नदीकाठी मासे मरून पडलेले दिसतात.

आज कित्येक पर्यटनस्थळी स्वातंत्राच्या नावाखाली धुडगुस चालला आहे. सहल म्हटले कि मद्यपान आलेच (अपवाद वगळून). आपल्या महाराष्ट्रातच बेहोष करणारे एवढे निसर्गसौंदर्य आहे कि, ह्या कृत्रिम नशेची लोकांना का गरज लागते तेच कळत नाही. मद्यपानाचा आस्वाद घेऊन झाल्यावर टाकलेल्या बाटल्यांचा खच, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिकचा कचरा हे दृष्य आज सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणांना पर्यटनस्थळांचा दर्जा लाभल्याने तेथे मानवनिर्मित उपद्रव या स्थळांची शांतता व सौंदर्य बिघडवत आहे. यातून आपल्या महाराष्ट्राचे वैभव असलेले गड किल्लेही सुटले नाहीत. या ऐतिहासिक वास्तुंवर आपल्या येण्याची नोंद करून ठेवणारे महाभाग पर्यटक काही कमी नाहीत. नवल फक्त एका गोष्टीचे वाटते की, ज्यांनी ह्या वास्तू उभारल्या त्यांना कधी आपले नाव त्यावर कोरावयाचे वाटले नाही पण आपण मात्र सर्वत्र आपल्या नावाची नोंद करत असतो.
 
परदेशातील लोक मात्र ह्या बाबतीत काटेकोर असतात. फिनलंडला असताना आम्ही काहिजण तेथील नुक्सियो ह्या नॅशनल पार्क मध्ये गेलो होतो तेंव्हाच एक अनुभव. आम्ही कॅंप फायर करण्यासाठी २ तासांची पायपीट करून एका सुंदर तळ्याकाठी आलो. कॅंप फायरसाठी ती एक चांगली जागा असल्याने काही लोकांनी तेथे अगोदरच सोय (लाकुड, बसायला जागा, लाकडे कापण्यासाठी हत्यारे इ. ) करून ठेवली आहे. आम्ही तेथे आमच्या काही फिनिश मित्रमैत्रिंसोबत सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलो. कॅंप फायर झाल्यानंतर प्रत्येकाने तेथे पडलेला कचरा न सांगता गोळ केला आणि आपआपल्या बॅगेत भरला. एकाने तळ्यावर जाऊन पाणी आणले व त्या आगीवर टाकले. जाण्यासाठी जेंव्हा आम्ही परत निघालो तेंव्हा वाटतच नव्हते कि येथे कोणी सहलीसाठी आले होते इतका तो परिसर स्वच्छ केला होत. परत १ तासाची पायपीट करून जेंव्हा कचऱ्याचा डबा बाहेर दिसला तेंव्हा सगळ्यांनी आप आपल्या बॅगांमधला कचरा त्यात टाकला. मनात लगेच विचार आला आपण हे आणि असे काटेकोरपणे कधी पाळायला शिकणार? आपल्याकडे तर "स्वच्छता राखा" ह्या फलकावरच हल्ली रंगबिरंगी पिचकाऱ्या दिसतात.

प्रत्येकजणांच्या मनात विचार असेल कि, मी काय करू शकतो पर्यावरणाचे रक्षण करण्याकरीता. मागे एका मासिकात वाचलेल्या एका उपक्रमाचा येथे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. तो उपक्रम असा होता कि, आपण वर्षभर जी फळे खातो उदा. आंबा, संत्री, फणस, जांभुळ इ. (उन्हाळ्यात तर भरपुर फळे उपलब्ध असतात) त्या फळांच्या बिया फेकून न देता त्या साठवून ठेवाव्यात आणि  पावसाळा सुरू झाला कि आपल्या वर्षासहलीच्या दरम्यान त्या रुजतील अशा ठिकाणी उधळायच्या. मस्त आहे ना हा उपक्रम! विचार करा त्या बियांपैकी काही जरी रुजल्या आणि हजारो हातांनी हे काम केले तर नक्कीच परिसर सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. सध्या वर्षासहलीला जाण्याचे फॅड वाढले आहे. काही हौशी पर्यटक अशा निसर्गरम्य स्थानी जाऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या इ. कचरा फेकतात. त्याच ऐवजी जर या बिया उधळल्या तर आपल्या हातून पर्यावरणाचे रक्षण करण्यात खारीचा वाटा झाला याचे समाधान मिळेल.

याच बरोबर मी अजून एक सुचवू इच्छितो कि, ज्यांना वर्षासहलीस जाणे शक्य नाही त्यांनी या सर्व बिया साठवून ठेवाव्यात. आपल्या महाराष्ट्रात आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपुरास पायी जाणारे वारकरी असतात त्यांच्याकडे त्या द्यावेत. आषाढी एकादशी तर भर पावसात म्हणजेच साधारणतः जुलै महिन्यात असते. त्या बिया जर तुम्ही वारकऱ्यांकडे दिल्या तर ते आपल्या दिंडी परिक्रमेत उधळत जातील. अशा प्रकारे त्यांना ईश्वरसेवेबरोबर निसर्गाचीही सेवा करण्याची संधी मिळेल.

हा लेख वाचून काही लोकांनी जरी ह्या बाबतीत विचार करायला सुरुवात केली तरी ह्या लेखाचे सार्थक होईल. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका.

- योगेश जगताप