गंमतीदार शीर्षकं

                                गंमतीदार शीर्षकं                           

          पुस्तकाचा वाचक किंवा चित्रपटाचा प्रेक्षकही शीर्षक वाचूनच आत काय दडलेलं असेल याचा
अंदाज बांधत असतो.
     ग्रंथपालाला मात्र शीर्षक वाचून सोडून देता येत नाही. पुस्तकांच्या नोंदी करण्याच्या प्रक्रियेत
पुस्तक नुसतं हाताळावं लागत नाही तर चाळावंही लागतं. प्रस्तावना, अनुक्रमणिका वाचाव्या
लागतात. मलपृष्ठावरची माहितीही पाहावी लागते.   आजकाल वेबसाईटही नजरेखालून घालावी लागते.
हे असं सगळं पाहात असताना काही गंमतीदार, विचार करायला लावणारी, अगदी दिशाभूलही
करणारी शीर्षकं हाताखालून जातात.
        'बंगलोर टायगर' हे दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक. शीर्षक वाचून एखाद्याला वाटेल,
बंगळूर परिसरातल्या वाघांबदल काही उपयुक्त माहिती असावी. तसं वाटलं तर तो फसलाच म्हणून
समजायचं. भारतीय कंपन्यांना स्पर्धेत राहण्यासाठी यापुढे काय काय करावं लागेल, याचं सविस्तर विवेचन
या पुस्तकात 'विप्रो' या कंपनीचं उदाहरण देऊन केलं आहे. बंगलोर ही भारताची सिलिकॉन
व्हॅली समजली जाते. 'विप्रो' हे तिथलं आघाडीचं नाव. सॉफ्टवेअर कंपन्यांमधला वाघच तो जणू! वाघ अरण्यात
आपलं साम्राज्य वाढवायला जसं वागतो, तसंच काहीसं 'विप्रो' वागली, असा तो शीर्षकाशी संबंध आहे. सिंह
अरण्याचा राजा खराच; पण आकर्षण आणि भय वाघाचं जास्त असतं.  
     'हू सेड एलिफंटस कांट  डान्स? ' हे असंच  एक शीर्षक. आयबीएम कंपनीच्या माजी 'सीईओ'ने
पुस्तक लिहिलं असून कंपनी यशस्वी होण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यात आहे.
व्यवस्थापन आणि नेतृत्वगुणांच्या योग्य अंमलबजावणीकरीता हे पुस्तक जरूर वाचावं, असं सांगतात.
स्वतःच्या तुंदिलतनूमुळे जराशी हालचाल झाली तरी ती स्वागतार्ह, अशी हत्तीची अवस्था असते.
तो नाचायला लागला तर पाहण्यासारखा कार्यक्रमच होईल. ‘आयबीएम’ ने धोरणात केलेल्या बदलांमुळे
हत्तीसारखं संथ, मरगळलेलं, रेंगाळलेलं रूप जाऊन तिला एक चैतन्य प्राप्त झालं आणि ती जागतिक स्पर्धेत
सफाईदारपणे वावरू लागली... लेखकाने शीर्षकात विचारलेला प्रश्न समर्पक नाही, असं कोण म्हणेल?
     'जैनिझम अँड इकॉलॉजी', 'हिंदूइझम अँड इकॉलॉजी', 'बुद्धिझम अँड इकॉलॉजी' ही काही
पुस्तकं आहेत. 'जैनिझम आणि बुद्धिझम', 'जैनिझम आणि हिंदूइझम' अशी शीर्षकं असली तर
थोडीफार संगती लावता येते. दोन विचारसरणींचा तुलनात्मक अभ्यास, असा तर्क सामान्य वाचकही
करू शकतो. पण 'इकॉलॉजी सारखा शब्द धर्मावरच्या पुस्तकात येऊ शकतो का', या प्रश्नाचं उत्तर
'होय'  असंच आहे. इकॉलॉजीचा आणि या धर्मांचा संबंध या पुस्तकांमधून उलगडून
दाखवला आहे. पर्यावरणाशी हे धर्म आपापल्या परीने काय नातं सांगतात, याचा उहापोह ही पुस्तकं
करतात. धर्म-पंथांच्या अभ्यासकांना हा नवा दृष्टिकोन या पुस्तकांमुळे मिळू शकतो.   
     ‘लेट अस सी’ हे नाव जे संदर्भाविनाच ऐकतील, त्यांना ते एखाद्या डॉक्टरने डोळ्यांच्या आरोग्यावर
किंवा फोटोग्राफरने फोटोग्राफीवर लिहिलेलं पुस्तक वाटल्यास नवल नाही. संगणकविश्वातल्या बहुतेकांनी
'लेट अस सी' ची पारायणं केलेली असतात. त्यातला 'सी' पाहत नाही, तर संगणकीय भाषा सुचवतो!
‘लायनक्स बायबल २००७’ हे अलीकडचं पुस्तक. बायबलला ख्रिश्चन धर्मात महत्त्व आहे. हे पुस्तक
संगणकविश्वातल्या लोकांसाठी, विशेषतः ‘लायनक्स’ ही प्रणाली वापरणा-यांसाठी अगदी बायबलच आहे,
असं सुचवणारं हे चतुर व्यावहारीक शीर्षक आहे.
     'हीट' या शीर्षकाचं पुस्तक भोतिकशास्त्रावर नसूही शकतं. माईक ल्युपिका या लेखकाचं  गेल्या वर्षी
प्रकाशित झालेलं हे पुस्तक बेसबॉल खेळणा-या भावांवर आहे. ‘एक्लिप्स’ या पुस्तकाचा ग्रहणाशी संबंध नाही.
हेही गेल्याच वर्षीचंच पु्स्तक आणि त्याचा वाचकवर्ग आहे आहे पोगंडावस्थेतली मुलं!
    ‘मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस’ हे पुस्तक इंग्रजी वाचणा यांमध्ये फार लोकप्रिय
आहे. विशेषतः तरूण वर्गामध्ये! पुरूष आणि स्त्रीच्या मूलभूत स्वभावविशेषांवर अचूक बोलणारी अशी ही
छोटीशी कलाकृती आहे. दांपत्याने एकमेकांचे नैसर्गिक स्वभाव ध्यानात घेऊन कसं वागावं, हे खुसखुशीत
शैलीत लेखक विशद करतो. शीर्षकात शनी, गुरू, बुध ही नावं का नाहीत? मंगळ व शुक्र याच ग्रहांची
नावं असण्यामागे एक ज्योतिषशास्त्रीय आधार आहे. मंगळ स्वभावाने कठोर तर तर शुक्र रसिकतेशी संबंधित
ग्रह आहे, असे सांगितले गेले आहे. कठोरता आणि रसिकता जेव्हा एकमेकांशी बोलू लागतात तेव्हा काय होतं,
ते वाचल्याशिवाय समजणार नाही.
    मराठीत 'ही श्रींची इच्छा' हे एक गाजत असलेलं पुस्तक आहे. एखाद्या ऐतिहासिक नाटकासारखं
वाटणारं शीर्षक प्रत्यक्षात वेगळंच जीवननाट्य दर्शवतं. श्रीनिवास ठाणेदार या यशस्वी मराठी उद्योजकाने
अनंत कौटुंबिक व इतर अडचणींना सोसून अमेरिकेत उभारलेल्या उद्योगाची ती कहाणी आहे. ठाणेदार यांनी
ती स्वतःच चितारली आहे. ते म्हणतात, ‘मनाची जिद्द असेल आणि झेप घेण्याची इच्छा असेल तर
परिस्थितीच्या बेड्या तुम्हाला अडकवू शकणार नाहीत’. शीर्षकातला ‘श्री’ शब्द सूचक आहे, हे सूज्ञास सांगणे
न लगे!
    ... पुस्तकांच्या अंगणातली ही काही टपली मारणारी मुलं! एकदा त्या दुनियेत शिरलं की अशी अनेक
मुलं भेटतात. पुस्तक चाळून काम होतं पण कधी कधी चाळणंही विचार करायला लावतं;   पुस्तक वाचायलाच
लावतं आणि मग त्या शीर्षकांमागची लेखकाची मानसिकता उलगडते. आपल्यालाही ती मनोमन पटतात.
      काही नावं निरनिराळे अंदाज बांधायला खूप वाव देतात. 'डान्सिंग विथ द सॅक्रेडः इव्हॉल्यूशन, इकॉलॉजी
अँड गॉड'! 'सोशल कन्स्टक्शन ऑफ द पास्टः रिप्रेझेंटशन अज पॉवर'! पण अंदाज बांधल्यावर पुस्तक
वाचायला विसरायचं नाही, कारण अंदरकी बात कुछ ओर असते.
     लांबची नावं नको असतील तर आपल्या मराठीतली 'क' किंवा ‘ब्र’ ही शीर्षकं घ्या ना!
                                                                 - केदार पाटणकर