श्‍वानशक्तीचा विजय असो!

श्वानशक्तीचा विजय असो!

चला, गंगेत घोडं न्हालं म्हणायचं. माणूस नावाच्या "गाढवां'ना कुत्र्यांचा प्रामाणिकपणा तरी पटला. आजची "सकाळ'मधली बातमी वाचलीत? पुण्यात कुत्र्यांची मागणी दुपटीने वाढल्याची! आमच्या प्रामाणिकपणाला आत्ता कुठे भाव आलाय. बरं वाटलं.

बरेच दिवस याच विचारानं अस्वस्थ होतो. डायरी सुद्धा लिहावीशी वाटत नव्हती. आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेतला जात होता. "ही कुत्तरडी करायची काय? ' असले भोचक आणि अवमानास्पद प्रश्न विचारले जात होते. कुणीकुणी उपटसुंभ तर जंगलातून वस्तीत येणाऱ्या बिबट्यांसाठी खाद्य म्हणून सगळी कुत्तरडी जंगलात फेका, अशी भाषा करत होते. मुन्सिपाल्टीच्या लोकांपुढे तर कित्येक भाईबंदांनी हौतात्म्य पत्करलं. पण आम्ही त्यांच्या बाजूनं ठाम उभे राहिलो. म्हटलं, होताहेत क्रांतिकारक तर होऊ द्यात! हे बलिदान व्यर्थ जाणार नाही! काहींना बंदिवासात टाकण्यात आलं. त्यांच्यासाठीही लढा दिला. निदर्शनं केली. तुरुंगांच्या दरवाजांवर, अधिकाऱ्यांच्या घरांच्या भिंतींवर, दंडेलशाही करणाऱ्यांच्या चकचकीत गाड्यांवर जाहीरपणे तंगडं वर केली. तरीही काही फायदा झाला नाही.

आमचा प्रामाणिकपणा, आमची उपयुक्तता पटायला चोरांनी घरं लुटायला हवी होती. मुडदे पडायला हवे होते. भरदिवसा अपहरणं व्हायला हवी होती....!

असो, उशीरा का होईना, माणसांना शहाणपण सुचलं, हे महत्त्वाचं. त्या "व्होडाफोन'वाल्यांच्या सात पिढ्यांवर तंगडं वर करावं, असं जाहिरात बघून वाटलं होतं. कारण त्यांनी आमच्या एका परदेशी भाईबंदाला जाहिरातीसाठी कुठल्यातरी गाडीच्या मागे तंगडतोड करत पळायला लावलं होतं. पण त्यांनीच आमची "इमेज' सुधारली. कुठल्याही मदतीला तयार, अशी आमची ओळख लोकांवर ठसवली. आता त्या जाहिरातीतल्या कुत्र्याच्या तोंडावरची माशीही हलत नाही, ही गोष्ट अलाहिदा. पण आपल्या एका भाईबंदाचं कौतुक होतंय आणि आपला मान वाढतोय, हा आनंद मोठा होता. बरं, त्याच्या जातीतल्या इतर पंटर्सचीही किंमत वाढली ना त्याच्यामुळं!

मलाही कुण्या केळकरानं विकत घेतलाय. माजी लष्करी अधिकारी आहे म्हणे. आता त्याच्या शिस्तीत राहावं लागणार. आयला, गोचीच आहे! पण आता संधी मिळालेय. आता जिवाचं रान करून मालकाचं घर राखायचं. फक्त एकच प्रॉब्लेम होईल. स्वीटीला सारखं सारखं भेटता येणार नाही. सध्या ती तरी कुणाच्या घरची शोभा झालेय, कुणास ठाऊक! बाकी, ती काही घराच्या रक्षणाबिक्षणाच्या कामाची नाही म्हणा! ती पडली पामेरिअन! आमच्यापेक्षा वरच्या जातीतली. ती कुणातरी धनिकाच्या घरातच पडली असणार. कुणीतरी फटाकडी नको तेव्हा घरी येणाऱ्या बॉयफ्रेंडपासून संरक्षणासाठीच तिचा उपयोग करत असणार.

असो. हेही नसे थोडके!