उद्ध्वस्त झालेल्या अस्तित्वाच्या ढिगाऱ्याखालून
मी बाहेर पडते
अंगावरची धूळ झटकते आणि चालू लागते
नंतर लोक उकरत बसतात तो ढिगारा..
पण मला त्याचं काय?
आणि मला तेवढा वेळ तरी कुठेय?
मला चालायलाच हवं, नव्हे धावायला हवं
मी थांबले तर सगळ्यांची पोटं कशी भरणार?
न भरली तर न भरू देत.. मला काय?
मी काय मक्ता घेतलाय त्या सगळ्या पोटांचा?
पण.. रोखलेल्या बोटांपेक्षा
भुकेली पोटं बरी वाटतात..
त्यात एकदा घास पडला की कावकाव बंद!
मला मारणार? .. मी भीत नाही
छे छे .. मी अमर - बिमर काही नाही
पण मेलेल्याला काय मारणार?
मला केव्हाच खाऊन पचवलंय .. त्या सगळ्या पोटांनी.