छचोर

पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून, जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो, मी ढासळतो
दुसऱ्या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं, भिजवायला!
पाऊस इतका छचोर आहे साला!