खबऱ्याची 'खबर'

'असली' डॉन ते नवा कॉंट्रॅक्ट व्हाया "रिमिक्स' डॉन. बॉलिवूडचा हा प्रवास पाहिला तर अनेक चित्रपटनिर्माते, दिग्दर्शकांना गुन्हेगारी विश्वाची भुरळ पडल्याचे लक्षात येते. (आता तर बॉलिवूडची अंडरवर्ल्ड कनेक्शन्सही उजेडात आली आहेत. ) तद्वत प्रेक्षकांनाही अंडरवर्ल्डचे नेहमीच कुतूहल राहिल्याने या विषयावरील चित्रपट गल्लाभरू ठरणार, याची पक्की खात्री निर्मात्यांना असते. त्यामुळेच अंडरवर्ल्डचे काळे जग दाखविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. "डॉन', "धर्मात्मा', "सत्या', "कंपनी', "ब्लॅक फ्रायडे', "रिस्क', "शूट आउट ऍट लोखंडवाला' आदी चित्रपटांतून अंडरवर्ल्डचा कारभार प्रेक्षकांपुढे आला. "ब्लॅक फ्रायडे', "शूट आउट... ' हे तर सत्यघटनेवर आधारित आहेत. "कंपनी'ही त्याच पठडीतला. (राम गोपाल वर्माला मात्र ते मान्य नाही. ) या चित्रपटात दोन "डॉन'मधील संघर्ष दाखवलाय. "कंपनी' म्हणजे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातील संघर्षाची कथा असल्याचे म्हटले गेले. (खरेखोटे रामू जाणे! )
अंडरवर्ल्ड म्हटले की गुंड, पोलिस आणि एंकाऊंटर असे चित्र चटकन समोर येते. यात बाजूला राहतो, तो गुंड आणि पोलिस यांच्यातील चकमकींना कारणीभूत ठरणारा खबऱ्या. आजवर अनेक एंकाऊंटर स्पेशालिस्ट निर्माण झाले. त्यांचे नाव झाले. पैसा, ग्लॅमर त्यांना मिळाले; पण गुंडांची योग्य वेळी खबर देऊन पोलिसांना मदत करणारा "टिपर'/ "इंफॉर्मर' मात्र खबरीपुरताच मर्यादित राहिला. या विषयावरच दिग्दर्शक मणिशंकर एक चित्रपट घेऊन येतोय. त्याचं नाव आहे "मुखबीर. ' म्हणजे खबऱ्या. लवकरच तो प्रदर्शित होईल.
मणिशंकर हा गुणी दिग्दर्शक आहे. चाकोरीबाहेरच्या विषयांची हाताळणी हे त्याचे वैशिष्ट्य. यापूर्वी "टॅंगो चार्ली' चित्रपटातून सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), त्यातील जवानांचे जीवन त्याने जगासमोर आणले. आता खबरे कसे निर्माण होतात- केले जातात, कोण असतात ते, गुंडाची माहिती देणे जीवघेणे ठरू शकते हे माहीत असूनही ते पोलिसांना का मदत करतात, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे "मुखबीर' देईल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाद्वारे मणिशंकरने एक वेगळा विषय हाताळला आहे. खबऱ्याची "खबर' घेणारा "मुखबीर' एकदा तरी पाहायला हवा.
दुवा : www.santshali.blogspot.com