अजुनी एकाकी

अवसेची ही रात उजळते अंधाराच्या वाती गं

शोधित फिरते सुर्य उद्याचा अजुनी वाट एकाकी गं       IIधृII

सुर्य लोपता, अवतीभवती विश्व काजवी उरते गं

कशी शांतता म्हणू तयाला, हे  वेध वादळी दिसते गं

असे शहर अन असा प्रहर अन कुठे दिलासा नाही गं   II१II

शोधुनी दमले ईथे सीयावर, सभोवताली लंका गं

फोडित टाहो कृष्णनावचा, द्रौपदी भवती जमल्या गं

दैवच देते, दैवच नेते अणी खुलासा नाही गं                   II२II

दुरावले सारे नात्याचे, तिळतिळ धागे तुटती गं

साथ न उरली आज कुणाची, व्यथा वेदना हाती गं

लाटांवर भिरभिरते नौका, कुठे किनारा नाही गं            II३II

कुणी न उरला आज सोबतीस, खंत तयाची नाही गं

उरलीसुरली व्यथा आजची, उद्या मोगरा होईल गं

सुर्य पेटवू वाटांवर ह्या; अभिमानाच्या वाती गं              II४II