पाऊस!

भिजून भिजून, गात्री-

झेलून झेलून पाणी

झाडाशी बसून, गोड-

सुरात गातोय कोणी ॥

कातर कातरवेळी

लकेर, लकेर ओठी

पालवी, पालवी जशी

पानाच्या फुलते देठी ॥

सळसळ सळसळ पानी,

चाहूल, जिवाला भूल

मोकळ्या मोकळ्या वाटा

वाटांत ओलेते सल...॥

गारवा, गारवा रात्री

हवेत वेगळा नाद...

दुरून दुरून आली

कुणाची? कुणाची साद?

... झाडाशी झाडाशी खोल,

थरथर थरथर देही

डोळ्यात डोळ्यात दोन

पाऊस झाला प्रवाही ॥