पेंद्या स्फुरे, चल, कृष्णा रे, खेळ खेळुया दही काला
बोले कान्हा, जरा थांब ना, चीफ गेस्ट नाही तो आला
पेंद्या तो सुन्न, गोंधळात टुन्न, डोक्यावरी गेला सिक्सर
हरी बोलतो, समजावितो, अरे, हे कॉर्पोरेट कल्चर
तो आगळा, हा वेगळा, महिमा बदले काळाचा
भलतेच पेव, चढतात चेव, 'काल्याचा' हा नवा साचा
लाखमोलाची, दह्या दुधाची, पुराणात बांधती हंडी
लाखलाखाची, 'अर्थ' मडक्याची, फोडण्यास टेंपोत दिंडी
कानाखाली खाड, रिमिक्सची धाड, गण गवळण म्हणजे काय?
फवारे अफाट, ड्रिंक 'कॉल्ड' 'हॉट', थरथरतात गोपांचे पाय
डिजेंचे हात, चिअर गर्लची साथ, बघ झकास आहे फंडा
सोबतीस 'स्टार', चालतील 'भिकार', सण संस्कृतीस घालू गंडा
'टोपी' वाल्यांनी, 'टाय' वाल्यांनी, गर्दीचे जाणले हे तंत्र
प्रायोजकी थाट, टी शर्टची लाट, घुमे जाहीरातीचा मंत्र
वाढतेय उंची, फुगतेय चंची, काय हरवले, कोणा भान?
थरावर थर, स्वार्थात भर, मंडळात स्पर्धा तुफान
पेंद्या तो दीन, जाहला लीन, म्हणे, धन्य धन्य तुम्ही देवा
'दही' नासले, 'काला' बाधले, तरी राखी शांती माधवा