असे का गजानना?
गणनायकाची केली या भारताने भक्ती,
सदा आक्रमणे का असे आपुली नियती?
जुलमी ती मोगलाई मग इंग्रजांची सत्ता,
का न टाळता आली तुला सुखकर्ता ?
विघ्नहर्ता तू असता एकदंत,
का झालेत हे दहशतवादी उन्मत्त?
आहेस तू विद्येची देवता,
देशात का तरी निरक्षरता?
चौसष्ट कलांचा तू आहेस स्वामी,
तांडे बेकारांचे का न होती कमी?
सर्वत्र भरले एकच ईश्वरी तत्त्व,
मग का एकाच "राजाला" एवढे महत्त्व?
पाहिल्यावर हा सारा विरोधाभास,
न राही तुझ्यावरही विश्वास..
इंग्रज, अमेरिकी, चीन्याना न तू पूज्य,
कला, क्रीडा, विज्ञानवर तरी त्यांचेच अधिराज्य.
लोकसंख्येत आहो आम्हीही अब्जाधीश,
तरी कुठे कमी पडतो सांगा गणाधीश! सांगा गणाधीश...
- मंदार