प्रश्नांत खरोखर जग जगते

एकदा अघटीत घडले.
देवाच्या असंख्य न उमगणार्‍या लीलांपैकी एक लीला.
माणसांना प्रश्न पडायचेच थांबले.
कोणी कुणाला काहीच विचारेना.
आपणा स्वतःला नाही. आई वडिल मुलांना नाही.
मुले शिक्षकंना नाही. मालक नोकराला नाही.
जनता राजकारण्याला नाही.
कोणाच्या मनांत काहीच प्रश्न उरले नाहीत.
मग विचारणार काय?

सगळे कसे स्वच्छ माहीत आहे.
प्रत्येक जण माहीत असलेल्या ज्ञानाच्या आधारे काम करू लागला.
नवीन आलेला कोणी, प्रश्न विचारत न बसता, इतरांचे पाहून तसेच करू लागला.
नवीन जन्माला आलेल्या बाळासारखा.
जर अनुकरण करून, किंवा पाहणी करून काय करायचे ते कळले नाही,
तर फारच सोपे. काहीच करायचे नाही. जैसे थे.

काही दिवस थोडा गोंधळ उडाला.
पुर्वी गोंधळ झाला की हजार तोंडे, दहा हजार प्रश्न विचारायची.
त्या दहा हजार प्रश्नांना वीस हजार उत्तरे मिळायची.
त्यातून जे काही केले जायचे,
त्या कार्यामधऊन नवे चाळीस हजार प्रश्न उदभवायचे.
पुर्वीचे हे अविरत प्रश्न चक्र थांबले.

जग हळुहळू नव्या व्यवस्थेत रुळले.
लोक ह्या बदलावर टिका करायचे थांबले.
लवकरच ह्या बदलाचे फायदे दिसू लागले.
माणसांमधील हव्यास हद्दपार झाला.
हेवेदावे भूतकाळात जमा झाले.
कोर्टातले जुने लाखो खटले सटासट सुटले.
नवीन खटले येईनात.
वकीलांनी शेती करायला सुरवात केली.
सेन्सेक्स धृवतार्‍यासारखा स्थीरावला.
शेअर्सची विक्री खरेदी थांबली.
लवकरच शेअर बाजार बंद झाला.
कागदी बैल अन कागदी अस्वले नाचवायचे थांबून,
लोक उत्पादक कामे करू लागले.
कारखन्यांचे उत्पादन वाढले.
वर पओहोचून तिथेच स्थीर झाले.
इतरही सगळे स्थीरावले.
नवीन संशोधन नाही. नवीन उत्पादने नाहीत.
लठ्ठ बातमीपत्रे रोडावली.
सारे जग एक शुद्ध स्थीरांक बनले.
एकूण सारी मानवजात सुखी असावी असे वाटत होते.
वाटत होते अशासाठी म्हणायचे,
आपण सुखी आहोत कां दु:खी, असा प्रश्नच शिल्लक नव्हता.

भाषांमधून प्रश्नचिन्ह नाहीसे झाले.

हे अघटीत पाहून, काळाने देखील शिकवण घेतली.
एकही प्रश्न उरला नसल्याने, काळाने उत्तरासाठी भविष्यात वणवण भटकणे थांबवले.
घड्याळाच्या सुईला ह्यानंतर कुठे जाऊ
असा प्रश्नच पडला नाही.
काळाचे काटे थबकले.

सारे प्रश्न जसे संपले, तसे उदगार, स्वल्पविराम इत्यादी सारेच विरले. उरला फक्त पूर्णविराम.
................................................................................................................