बोंबलाचे भुजणे

  • ६ ते ८ ओले बोंबील
  • ४ इंच आले
  • ४ - ५ मध्यम हिरव्या मिरच्या
  • ८-१० लसूण पाकळ्या, चिंच
  • ५ मध्यम कांदे
  • रिफाईंड तेल
  • हिंग
  • हळद, तिखट पूड, चवीसाठी गरम मसाला, मीठ
  • १/२ नारळ खवून, ८-१० काळे मिरे
  • ताजी कोथिंबीर
४५ मिनिटे
४ जणांसाठी

प्रथम बोंबील धुवून घ्या. १ चमचा हळद, २ चमचे तिखट, १ चमचा गरम मसाला व १ चमचा मीठ चांगले चोळून लावा. चिंचेचा पाण्यात कोळ करा, तो ही बोंबलाना लावून घ्या. अर्ध्रा तास मुरू द्या. 

आता या रिकाम्या वेळात ४ १/२ कांदे मध्यम चिरून घ्या. मिरच्यांचे तुकडे करा. आल्याचेही बारीक तुकडे करा. लसूण ठेचून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

खवलेले खोबरे, अर्धा कांदा व काळे मिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

साधारण ६-७ चमचे तेल एका जाड तळाच्या व शक्यतो उथळ पालेल्यात चांगले तापवून घ्या. यात चिमूटभर हिंग घाला. ते फुलले की ठेचलेली लसूण व आल्याचे तुकडे घाला. चांगले खरपूस तळसावून घ्या. आता चिरलेल्या मिरच्या व कांदे घाला, चांगले तळसावून घ्या.

बोंबलांमध्ये वाटलेले खोबरे मिसळून घ्या आणि हे मिश्रण वरील फ़ोडणीमध्ये मिसळा. बोंबलाना मीठ लावले असेल त्या प्रमाणात मीठ घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. एक उकळी आली की बंद करा. जास्त ढवळू नका. जास्त पाणी नको, जाडसरच असू द्या.

कोथिंबीर घालून वाढा.

गरम तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी / भाता बरोबर हे झणझणीत भुजणे छान लागते.

१. काही लोक बोंबील जड सामानाखाली (पाटा इ. ) ठेवून त्यांचे पाणी काढून मग शिजवतात. पण साधारणपणे भुजणे करताना पाण्यासकट बोंबील जास्त चवीष्ट लागतात.

२. बोंबील हा मासा पटकन शिजतो. म्हणून जास्त उकळण्याची गरज नाही. तसेच जास्त ढवळून बोंबील विरघळून जातील, म्हणून जास्त ढवळू ही नका.

३. वाढताना सुद्धा नाजूकपणे उचलावे, नाहीतर बोंबील तुटतात.

सौ. आई