प्रत्येकाची एक कविता...

येथे प्रत्येकाचीच असते

दैवाविषयी रडरड...

आत्मविश्वासाच्या जोडिला

प्रयत्नांची परवड...

येथे प्रत्येकालाच आहे

भविष्याची चिंता...

आजचा दिवस ढकलताना

कालचा होतो गुंता...

येथे प्रत्येकजण जातो

आपापल्या वाटेने...

स्वतःच हरवून शोधतो

स्वतःलाच नव्याने...

येथे प्रत्येकाच्या पाठी

ब्रह्मराक्षस उभा आहे...

एकटाच चालला तरीही

तोच त्याचा सखा आहे...

येथे प्रत्येकाच्या डोळ्यांत

दिसते स्वप्नांचे मृगजळ...

आकाशाला गवसून आणायचीय

चांदण्यांची ओंजळ...

येथे प्रत्येकाची आशी

वेगळीच एक कथा आहे...

आपापले मनोगत नि

आपलीच एक कविता आहे...