माफीनामा!

"अनफर्गेटेबल टूर' संपवून मी परतीच्या प्रवासाला लागलो असताना वाटेत ढीगभर एसएमएस मिळाले. जयानं मुंबईत काहितरी विधान केल्याबद्दल गदारोळ उडाल्याचं कळलं. भावना दुखावल्या गेल्या आहेत, ही माझी त्यावरची पहिली प्रतिक्रिया होती. तसं झालं असेल, तर आम्ही माफी मागतो.
महाराष्ट्र ही आमची आई आहे आणि आईचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही. आईच्यान!
मराठी आणि महाराष्ट्राने आम्हाला भरपूर काही दिले आहे आणि आम्ही हे उपकार कधीच विसरणार नाही. आम्हीही आमच्या परीने मराठी माणसांवर, मुंबईवर, शिवसेनेवर, मनसेवर, मूळ आणि "नवनिर्माण' झालेल्या ठाकरे परिवारावर प्रेमच केले आहे. कृतघ्नतेची भावना आमच्या मनात कधीच नव्हती.
मराठीवर प्रेम नसल्याचा आरोप आमच्यावर सातत्याने होतो. तो चुकीचा आहे. मराठीसाठी आम्ही काय केले नाही? कुठलेही संकट आले, की आम्ही पाया पडतो, ते दादरच्या सिद्धिविनायकाच्याच. मी यूपीचा आहे, म्हणून सारखी काशी-मथुरेकडे धाव घेत नाही. मध्यंतरी अभिषेकच्या लग्नाच्या वेळी मंगळ "शनी' ठरू नये, म्हणून तिकडच्या काही देवळांत यज्ञयाग केले, पण ते तेवढ्यापुरतेच. म्हणून सिद्धिविनायकावर आमचा विश्वासच नाही, असं कुणी म्हणू शकत नाही. मी, जया, अभिषेक, ऐश्वर्या सगळ्यांनी अनेकदा त्याची पायी वारी केली आहे.
मध्यंतरी मी बाराबंकीत जमीन घेतली, तशीच पुणे जिल्ह्यातल्या मावळ खोऱ्यातही घेतली. उत्तर प्रदेशात आमच्या मित्राचं सरकार आहे, म्हणून महाराष्ट्रावर अन्याय होऊ दिला नाही. जयाचं शिक्षण पुण्यात झालं, तसं अभिषेकचं शिक्षण आम्ही मुंबईतच केलं. त्यासाठी आम्ही दोघंही आग्रही होतो. डेहराडूनला त्याला ठेवण्याचा मित्रपरिवाराचा सल्ला आम्ही मानला नाही.
मुख्य म्हणजे, आमचे सगळे चित्रपट आधी मुंबईत प्रदर्शित झाले. त्याबाबतही मी कुणाचे काही ऐकले नाही. मुंबई ही आमची कर्मभूमी आहे आणि इथेच चित्रपट प्रदर्शित व्हायला हवेत, याबाबत मी स्वतः आग्रही होतो.
बाळासाहेबांशी मैत्री केली, ते केवळ ते मराठी आहेत म्हणून. त्यामागे काही स्वार्थ नव्हता. मुंबईत राहणाऱ्या, काम करणाऱ्या अनेक मराठी माणसांशी मी प्रसंगानुरूप अनेकदा स्वतः बोललो आहे. माझ्या युनिटमधल्या मराठी माणसांशीही मी संवाद साधत असतो.
अभिषेकच्या लग्नाची सर्व खरेदी आम्ही मुंबईतच केली आहे. पॅरिस किंवा ऍमस्टरडॅमहून सूट आणावा, अशी अभिषेकची मागणी होती, पण मी त्याला सविनय नकार दिला. आता, मराठी माणसाच्या दुकानातून खरेदी केली की नाही, हे नेमकं सांगता येणार नाही. मात्र, याबाबत मी अधिक काही विधान करणार नाही. नाहीतर, "मुंबईत मराठी माणसाची दुकानं आहेत तरी कुठे, ' असं मी म्हटल्याचा नवा वाद निर्माण होईल.
आम्ही शांतताप्रिय आणि कायदेप्रिय माणसं आहोत. लाखो रुपयांचा कर बुडवल्याबद्दल, जमिनीच्या मालकीबाबत शेतकरी असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल, पैशांच्या घबाडासाठी अनिवासी भारतीय म्हणून नोंदणी केल्याबद्दल, जेव्हा जेव्हा आम्ही कायद्याचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या, तेव्हा सरकारी दट्ट्या आल्यानंतर त्याची प्रामाणिक कबुली देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. त्याबद्दल आमच्याविरुद्ध कुणी बोट दाखवू शकत नाही. "एबीसीएल' गाळात गेली, तेव्हा मुलायमसिंहांनी, अमरसिंहांनी आम्हाला मदत केली असेल, पण ती केवळ मैत्रीपोटी. महाराष्ट्रातल्या कुण्या नेत्यानं आम्हाला मदतीचा हात दिला असता, तर आम्ही तो नाकारला असता, असे नव्हे!
ऐश्वर्याच्या नावानं उत्तर प्रदेशात आम्ही शाळा सुरू केल्यावरून गहजब माजला. बच्चन परिवारातल्या कुणाला ना कुणाला सतत चर्चेत ठेवायचं, ही मीडियाची हल्ली गरजच झाल्यासारखी वाटते. आम्ही मात्र त्यामागे वाहवत जाणार नाही. ऐश्वर्याच्या नावाची शाळा यूपीमध्ये काढली, ती काही केवळ तिकडच्या प्रेमापोटी नव्हती. कुणीही आपल्या मातृभूमीसाठी एवढं करतोच ना! आता नातवाच्या नावे गडचिरोलीत महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्या संधीच्या सध्या प्रतीक्षेत आहे.
आणखी एक. ब्लॉगही आता मराठीतून लिहिण्याचा विचार आहे. पण माझ्या लॅपटॉपवर फॉंटचा प्रॉब्लेम आहे. तो दूर झाला, की करेनच सुरुवात! मराठी वाचकांना ब्लॉग वाचण्यास आणि मराठीतून त्यावर कॉमेंट टाकण्यासही माझी अजिबात मनाई नाही. एवढे मराठीद्वेष्टे आम्ही नक्कीच नाही. कुणाला काहीही वाटले, तरी!!

-आपला,
अमिताभ बच्चन.
---------

सोबत वाचा :

http://www.manogat.com/node/14696