हा ओळखीचा रस्ता
नेई कुठे?... हा रस्ता
सांभाळ... तेथे खड्डा
घेई कुशी, हा रस्त्ता
वळणात वळतो सहजी
साधा.. सरळ.. हा रस्ता
ना एकदाही गेला
गावी तुझ्या हा रस्ता
चौकात एक दुज्याला
गाठून भेटे हा रस्ता
ठावूक हे कोणाला
झोपे कधी हा रस्ता?
'धरतो नभा' म्हणूनी
उंचावला हा रस्ता
सोसून साऱ्या घावा
भेगाळला हा रस्ता
मागे निरोप कुणाचे
वाटांकडे हा रस्ता
मज रोज येता-जाता
सांगे कथा हा रस्ता
बघ, बोळ झाला आता
होता कधी हमरस्त्ता
वसले इथे ते सारे
घेऊन दारी रस्ता
गर्दीत जाणाऱ्यांच्या
गेला हरूनी रस्ता
ते झोपले वाटसरू
घेऊन उशीला रस्ता
कोण्या अनाथा वाटे
बापापरी हा रस्ता
मी थांबलो, मज सोबत
बघ, थांबला हा रस्ता