निराळे

निराळ्या नभाचे निराळेच रंग
निराळ्या ढगाचे निराळेच ढंग...

निराळ्या ऋतूचा निराळा कहर हा
शिशीरात आला फुलांना बहर हा...

निराळा किनारा, निराळेच वादळ
निराळीच होडी पाण्यात अवखळ...

निराळाच चंद्र, निराळीच रात
स्वप्ने निराळी खरी भासतात!...

निराळेच दिसते जग नेहमीचे
निराळेच गमते मज ओळखीचे...

निराळेच कोणी मज भेटलेले
निराळ्या स्वतःला मी शोधलेले...