अख्खे घर अगदी धुवूनपुसून स्वच्छ करायचा पंचवार्षिक योजनेसदृश कार्यक्रम मी दरवर्षी पक्ष लागला की करायचे. गेली काही वर्षे मात्र या नियमाला खीळ बसली होती ती मी नोकरीनिमित्ताने गावोगावी जणू काही फिरतीवरच निघाल्याने सुट्टीच न मिळत असल्याने. कधी एकदा तो चान्स मिळतोय आणि घर आपादमस्तक आवरायची संधी मिळतेय असे झाले होते. नेमके ही वाट बघत असतानाच नवीन घरी शिफ्ट होण्याबद्दल आईबाबांचे एकमत झाले आणि त्यांना मदत करायला येण्याच्या निमित्तानेच का असेना पण मनसोक्त सुट्टी घेण्याचा आणि घर अगदी सुरेख साफसूफ करून लावण्याचा परवाना मिळाला. मला जर कुठली गोष्ट अत्यंत म्हणजे अत्यंतच प्रिय असेल तर ती आहे आवडती गाणी लावून घर आवरणे ही ! हो. मला माहितेय. तुमच्या चेहऱ्यावर 'काय येडमट पोरगी आहे' असे भाव आले असणार ते पण सत्याला पाठ दाखवून काय फायदा.. नाही का?
मुव्हर्स आणि पॅकर्सने सामानाचे बोचके, गठ्ठे, खोके ( पैशाचे नाही हो, सामानाचेच ), पेट्या ( याही सामानाच्याच ! ) वगैरे आणून टाकत होते. पहिल्या फेरीत आलेल्या सामानातून सर्वात आधी मी कशीतरी जागा करून स्टूल ठेवले आणि त्यावर डीव्हीडी प्लेअर नीट साफसूफ करून ठेवला त्याच्या स्पिकर्ससकट. कनेक्षन्स केले. आवडत्या गाण्यांची सीडी ( ही आईच्या लेखी निषिद्ध आहे तर बाबांच्या परीक्षणालाही बळी पडू नये म्हणून ते असताना कटाक्षाने न लावलेली अशी. ) काढून ती लावली आणि कमरेवर हात ठेवून त्या येऊन पडलेल्या पसाऱ्याकडे पाहिले.सीडीतली गाणी चालू झाली जी मी किती वर्षांनी ऐकत असल्यासारखे वाटत होते आणि खूपच उत्साह येऊन झपाझप हात पसारा आवरत होते. नवीन घरी मी एकटीच असल्याने ( आईबाबा जुन्या घरी सामान पॅक करवून घेत होते ) सगळे रान मला मोकळे असल्यासारखे होते. गाणे मोठ्याने गुणगुणत, मध्येच नाचत वगैरे अगदी मनसोक्त काम चालले होते माझे आवराआवरीचे. कधी 'पुरानी जीन्स और गिटार' तर कधी 'ना ना मुझे छुना ना दूरही रहना.. परी हू मैं' चालले होते.कधी 'माया मच्छिंद्रा मुझपे मंतर मत करना' तर कधी 'कैसी है ये रुत की जिसमे फूल बनके दिल खिले' चालले होते. किती आवरले आणि दिवस कसा सरला त्याचा पत्ताच लागला नाही. शेवटच्या ट्रिपसोबत आईबाबा नवीन घरी यायला आणि नवे घर 'चांद तारे तोड लाऊ, सारी दुनियापर मैं छाऊ' ने दणाणत असायला एकच गाठ पडली ! मी पुरती गुंगलेले गाणे ऐकत आवरण्यात त्यामुळे मला गपगुमान बाबांच्या परीक्षणाला सामोरे जावे लागले.. पण ते असो. आवराआवरीचा पहिला दिवस तर एकदम झकास गेला होता आणि इतका पराक्रम करूनही रात्री जेवायला मिळणार होते, हे काय कमी झाले का?!
दुसऱ्या दिवसापासून प्लेअर सभ्य झाला आणि केवळ भक्तीसंगीत आणि भावगीतेच गाऊ लागला. ह्या गाण्यांशी माझे काही वाकडे आहे असे नाही. मलाही ती बरीच प्यार आहेत पण शारीरिक मेहनत आवश्यक असलेल्या पसारा आवरण्याच्या कामात मला अपेक्षित उत्साह मला त्या गाण्यांमधून मिळत नाही त्याला मी काय करणार? इतर सगळ्या खोल्या आवरताना मला जबरदस्त थकवा यायला लागला तो यामुळेच होता की काय माहिती नाही पण सर्वात शेवटी मी माझी खोली आवरायला घेतली आणि डीव्हीडी प्लेअर माझ्या खोलीत आणून दरवाजा, खिडकी आणि पंखाही बंद करून ( पंखा चालू असेल तर आवाज कमी येतो म्हणून !!! ) माझीच सीडी लावली परत.. मग कुठे माझा थकवा पसार झाला आणि मन लावून पसारा आवरण्याचे काम चालू झाले. आता मी आवरत असलेला पसारा माझ्या स्वतःच्या वस्तूंचा होता. काय काय नव्हते त्यात? माझा लहानपणचा बाजा - याच्या मागे काय वेडी झाले होते मी, बापरे ! कोणाला हात लावू द्यायचे नाही, सोबत घेऊन झोपायचे ! प्लॅस्टीकचा चुटुकला कुत्रा असलेले माझ्या 'हिरो'च्या किल्लीचे किचेन.. 'हिरो' तर विकली पण तिची ती मोडकी किल्ली त्या शेपूटतुटक्या कुत्र्याच्या किचेनसकट इतके दिवस जपली होती मी. का ते मात्र माहिती नाही.इंजिनिअरींगचा सर्व दोस्त, शिक्षकांनी सह्या केलेला शर्ट सापडला आणि त्यातल्या एकेका सहीकर्त्यांबद्दलच्या आठवणींमध्ये मन गुंगून गेले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचे स्क्रॅपबुक आठवले.. हे घ्यायला पैसे नव्हतेच पण तरीही सगळे घेतात मग मीही घेणार अशा जिद्दीला पेटून जास्तीचे काम करून पैसे मिळवून घेतले होते.गिटार, लोकरीच्या विणलेल्या शाली, पडदे, तोरणे, वगैरे वगैरे अशी माझी आठवणींची सफर चालू होती. संध्याकाळ व्हायला आली तसे आई आली आवरण्याची प्रगती बघायला. "काय हे? अख्खा दिवस धिंगाणा लावून ठेवलायस पण आवरण्याच्या ऐवजी पसाऱ्यातच ब्रह्मानंदी टाळी लागल्यासारखी बसली आहेस की ! शर्थ आहे बाई तुझी अगदी.. बापाने लाडवून ठेवलंय अगदी कार्टीला.." वगैरे वगैरे.. तसे म्हटले तर तिचे अजिबात चुकले नव्हते. तिचे वर्णन ( बाबांनी लाडवून ठेवण्याबद्दलचे सोडून ) अगदी योग्यच होते. मीही काही कमी खमकी नाही म्हणा.. स्वयंपाकखोली आवरताना एकेक वस्तू पाहताना तिची अशी तंद्री लागली होती तेव्हा तिचा मूड ठीक आहे हे बघून मीही म्हणून घेतले होते तिला की - "तुझ्या नवऱ्याने अगदी लाडवून ठेवलेय तुला" !