रोज

रोज देवाकडे डोळे मिटून
काय प्रार्थना करत असते गं
तुझे अस्पष्ट शब्द कानी पडतात
त्यात मिसळलेले भावनांचे हुंदके
उमटत असतात मनात
मन दाही दिशांना भरकटत राहते
मला माहित आहे
तु माझ्यासाठीच
आणि तु मानत असलेल्या सुखाची
कितीतरी तोरणं लटकवत असते देवासमोर....
भीती वाटते गं मला माझी स्वत:ची
तुझ्या अपेक्षांना टक्कर देण्याची
हिंम्मत माझ्यात उरत नाही
तुझ्या अपेक्षांची उंची क्षणा-क्षणाने वाढत जाते
मग गुदमरून जाते मी... माझी..... स्वत:च
तिथे सारी स्वप्नं बाजूला ठेवून
तुझ्या स्वप्नांना आकार द्यायला जाते
नेमकी तिथेच आदळते
ऐन माझ्या स्वप्नांच्या पाऊलवाटेवर........