एक क्षण

एक क्षण
तुझ्या आठवणीने व्याकूळ होते
तुझ्या सहवासातले
सुख- दुखा:चे क्षण
हाताच्या मुठीत घट्ट धरून ठेवते
अलगद हळुवारपणे..
त्या क्षणांना हलकेसे चुंबते देखील
तो स्पर्श अधिक जवळचा वाटतो
मूठ अधिक घट्ट होत जाते......

एक क्षण
डोळे शांतपणे मिटून बसले तरी
अश्रूंचा झरा वाहतच असतो
बंद डोळ्यातही
तुझा लाघवी, गोड चेहरा मला दिसतो
तू जवळ नाहीस
या कल्पनेने मन थरकते ही

एक क्षण
तुझ्या उणीवेत जीव गुदमरतो
वाऱ्याचा हलका भास ही तुझा वाटतो
पुन्हा पुन्हा दचकते
आणि नंतर कष्टाने स्वत:ला सावरते ही

एक क्षण
मन जड होते
बरच काही साचत असतं मनात
व्यक्त करायला तू नाहीस
पुर्वी ही साचत असायचं
पण तेव्हा तू असायचा..
आता सुखाच्या क्षणाचे थर जमा होतात
तुझ्या उणीवेपोटी सुख ही जड वाटू लागते
एक क्षण, थरथरणाऱ्या शब्दांत ही तू जाणवतो