पाहतो आहेस ना मला

पाहतो आहेस ना मला
ताऱ्यांवरून
मला तुझा चेहरा दिसत नाही
पण चमचमणाऱ्या तारकांत तुला भासवून घेते
असह्य वेदना होतात
तुझ्या स्मृतींतल्या उणीवा जाणवताना.....
तरी डोळे लागलेले असतात त्या ताऱ्यांवर
माझ्याशीं संवाद साधणारं कोणीच नसतं
रात्रीच्या निरभ्र आकाशात चमचमताना
तूच माझा सोबती असतोस त्या क्षणीं...
जमिनीवर असताना पण तूच
आणि आता आकाशात असताना पण तूच
जमीन आकाशाला युगायुगांचे नाते म्हणतात ना
माझं तुझं नातं आता
याच अंतरात सामावलं आहे
तु असताना
तुझ्या सहवासातले प्रत्येक सुख- दु:खाचे क्षण
अजुनही मयुरपंखी म्हणून जपून ठेवले आहे
फक्त तुझ्या अस्थित्वाचा मनोरा तिथे नाही
आज एक एक पाऊल उचलताना
मनाचा तोल ठेच खात आहे
सुखाचे क्षण वाटायलाही तू नाही
आणि आता मनाचे गाठोडे रिते करायला ही तू नाही
तुझ्या अस्थित्वाच्या ठिकाणी
माझ्या पावलांची ओढ धावत जाते
वाटतं.... वाटतं.. तिथे तू मला तुझ्या माणसांच्या रुपात मिळतोस
कुठपर्यंत अशी धावत जाणार... माहित नाही
तुझी माणसे माझी वाट पाहतात
कदाचित.... माझ्याही रुपात त्यांना तू दिसत असशील
हे व्यक्त करायला मी ही तयार नाही
आणि तुझी माणसे ही
अजुनही जमिनीवर चालताना मनावर पावलांचे ठसे उमटत आहे
तुझ्या नसण्याची शोकांतिका वाटे-वाटे वर आछादली आहे
तुला दिसतं आहे ना एवढे लांबून आकाशावरून.... ताऱ्यांवरून...
पाहतो आहेस ना मला
ताऱ्यांवरून.....