या सम हा ....!

सभागृहात मिट्ट काळोख होता. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती. हळू हळू सारंगीचे सूर सभगृहात पसरू लागले... एक प्रकाशझोत स्टेजवर दिसू लागला.. त्यात एक लाल रंगाचा कुडता घातलेला तरुण आपल्या सारंगीतून सूरांची उधळण करत होता‌. सर्वजण मंत्रमुग्ध होउन पाहत/ऐकत होते. थोडावेळ आलापी झाल्यावर शेजारील तबल्यातून एक ताकदवर, खणखणीत बोल उठला... प्रकाशझोत आता तबल्यावर आला होता.... तो तोच होता.

अनेक वर्ष त्याने रसिकांच्या ऱ्हुदयावर अधिराज्य गाजवलेलं आहे... त्याला आज तालाच्या दुनीयेत कोणी प्रतिस्पर्धी नाहीत... तो उस्ताद झाकीर हुसेन. त्याने काही वर्षांपूर्वी पन्नाशी ओलांडली आहे हे खरे वाटणार नाही. आजुनही तबल्यावरची थाप तितकीच दमदार... ती ऐकून एखादे थांबलेले ऱ्हुदय परत धडकायला लागेल. कलेवरची असीम निष्ठा... कला माझ्यासाठी नसून मी कलेसाठी आहे ही विनम्र जाणीव.. कलाक्षेत्रात आत्त्युच्च स्थानावर असूनही रियाजात कधी कमी नाही... आणि सर्जनशीलता... निरनिराळे प्रयोग करण्याची आवड... त्यातूनच पाश्चिमात्य संगीता बरोवर हिंदुस्थानी संगीताचे फ्युजन, आणि हा विविध तालवाद्यांचा अनोखा कार्यक्रम Masters of percussion.

यात स्वतः उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बरोबर श्री व्ही. सेल्वागणेश (खंजीरा), श्री विनायक राम (ढोलक), खेतेखान (खरताल), आबोस कोसिमोव्ह (दोयरा) हे तालवाद्द्यांचे उस्ताद होते आणि सूरसंगत होती दिलशाद खान (सारंगी) आणि श्री निलाद्री कुमार (सतार) यांची.

सुरवातीला झाकीर हुसेन यंनी तीनतालातील पेशकार, कायदे, रेले पेश केले. तबला हे खर तर साथीचे वाद्य आहे.. पण त्याची सुद्धा एक स्वतंत्र परिभाषा कशी असते हे अतिशय रोचक पद्धतीने  समजाउन सांगीतले. ते ऐकत असताना त्यांचे श्रोत्याशी संवाद साधण्याचे अकृत्रीम कसब जाणवत होते.. ते म्हणाले Zebra crossing is the name of an animal in African jungle for Indians .   असे म्हणून  मुंबईच्या गणपतीच्या दिवसातील रहदारीचे वर्णन तबल्याच्या भाषेत कसे करता येईल ते सांगीतले.. ते सांगत असताना तबल्याचे बोल म्हणून ते तबल्यातून कसे उमटतात त्याचेही प्रात्यक्षिक दाखवले.  

मग सुरू झाला एक अनोखा प्रयोग Masters of percussion.. विविध तालवाद्य समान बोली बोलत होती. साथीला सारंगी आणि सतारीचे सूर होते.. त्यांनी "वैष्णव जन तो... " आणि "रघुपती राघव राजा राम... " या गाण्यांची धून वाजवली... अनेक वेळा ऐकलेली ती गाणी पण या सूर ताला च्या उस्तादांकडून ऐकताना दैवी वाटत होती. सभागृहातील काळोख्या शांततेत  प्रकाशझोतात बसलेले ते उस्ताद आणि त्यांनी उभे केलेले ते स्वरलयीचे विश्व...  हा एक अलौकीक अनुभव होता .  

सर्व कलाकार स्टेजवर येउन श्रोत्यांना अभिवादन करत होते .. त्या सर्वांच्या वरोबरच हा तालांचा बादशहा ... उस्तादोका -उस्ताद विनम्रपणे उभा होता .  त्याच्यातल्या कलेइतकाच त्याच्यातला माणूस सुद्धा श्रेष्ठ आहे .

म्हणुनच म्हणावेसे वाटते ... "झाले बहू ... होतील बहू  -  पण या सम हाच !!! "