.............................................
स्वगत!
.............................................
पुन्हा पुन्हा जरी मनात सूर्य पेटले!
इथे-तिथे सदैव काजवेच भेटले!
विसंगतीच पाहतो जरी चहूकडे!
सुसंगती, मला तुझे खरेच वावडे!
मनातल्या तमात मीच पाहतो मला!
प्रकाश आंधळा निमूट साहतो मला!
उदास एकटेपणात का बुडायचे?
प्रसन्न चेहऱ्यांसवे कसे रडायचे?
कळे न काय चालले मला सभोवती!
असून वा नसून मी मलाच सोबती!
असाच पोरकेपणात जन्म जायचा!
जगात आपलेपणा कुठून यायचा?
खरेच काय एकटाच भाग्यवान मी?
खरेच का नसेनही कुणासमान मी?
उगीच संभ्रमातले़; खुळ्या भ्रमातले!
प्रकाशही नको; जिणे नको तमातले!
अखेर कोण ऐकणार हाक मूक ही?
जगायची सुधारणार कोण चूक ही?
- प्रदीप कुलकर्णी
...........................................
रचनाकाल ः ११ जानेवारी १९९९
...........................................