बफेलो विंग्ज

  • चिकन विंग्ज २ किलो (२५-३०)
  • पाव लिटर व्हिनेगर, ४ चमचे तेल, २ चमचे वूस्टरशायर सॉस, २ चमचे लाल तिखट, पुढे चालू
  • लाल मिरच्यांचा चुरा, १-२ चमचा नुकतेच चुरडलेली मिऱ्याची पूड (भरड), २ चमचे टबॅस्को सॉस
  • ब्लू चीज़ डिप - यास (माझ्यामते घाण) विशिष्ठ वास येतो
  • त्याऐवजी रँच (सालाड) ड्रेसिंग वापरावे.
४५ मिनिटे
८ जणांना उपहार म्हणून

बफेलो विंग्ज हा एक चमचमीत खाण्याचा पदार्थ आहे.  बफेलो या शहराचे ते नाव आहे.  म्हशीशी त्याचा काही संबंध नाही.  कोंबडीच्या पंखाचे तुकडे शिजवतात.  हा साधारण जेवणाच्या आधी खाण्याचा किंवा उपहारासाठी खाण्याचा प्रकार आहे.  साधारण माणशी ३-४ तुकडे असा अंदाज धरावा.  मि स्वतः १०-१२ सहज खातो ती गोष्ट वेगळी!!

एका भांड्यांत चिकन विंग्ज सोडून सर्व पदार्थ एकत्र करा.
मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत विंग्ज आणि सर्व मिश्रण (मॅरिनेड) एकत्र करा.  चांगले नीट चोळून मिश्रण कोंबडीच्या तुकड्यांना लगू द्या.
पिशवी ३ तास शीतकपाटामध्ये ठेवावी.  मधून मधून चोळून ते मिश्रण परत परत त्या तुकड्यांमध्ये मुरू द्या.

कोळशाची भट्टी (बार्बेक्यू ग्रिल) तयार करा.
पिशवीमधील तुकडे काढून ते निथळू द्या.  वाटल्यास हलकेच कागदी पंच्याने तेल टिपून घ्या.
उरलेले मिश्रण परत लहान भांड्यात काढून ठेवा.
तुकडे कोळशावर भाजा.  एकीकडे मधून मधून उरलेले मिश्रण लावून तुकडे ओले राहतील याची दक्षता घ्या. 

[कोळशाची भट्टी नसल्यास, किंवा जास्त पसारा नको असल्यास घरातल्या भट्टीमध्ये (ओव्हन) एक थराने पसरून ४५० अं. फॅ. वर भाजू शकता.  तव्यावरही करता येतील पण उतरत्या भाजणीने चव कमी होत जाईल.]

गरमागरम तुकडे, सेलेरीच्या काठ्या (हा शब्द कडक वाटतो पण दुसरा आठवत नाही), आणि ब्लु चीज़ किंवा रँच ड्रेसिंग बरोबर द्यावा.  भारतीयत्व द्यायचे असेल तर काकडी किसून दह्यात कालवून देउ शकता.

रँच वा ब्लू चीज ड्रेसिंग घरी करू शकता, पण सहज बाहेर मिळत असल्यामुळे त्याची कृति देत नाही.

काही शंका असल्यास जरूर विचारा.  मी शक्यतो निवारण करीन.

आवडेल अशी आशा आहे.